Ranveer Allahbadia Supreme Court News: वादग्रस्त विधानानंतर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या रणवीर अलाहाबादियालान्यायालयाने फैलावर घेतले. 'त्याने केलेले विधान ही विकृत मानसिकता आहे. तो जे बोलला आहे, ते ऐकूण आईवडिलांना लाज वाटेल. बहिणींना लाज वाटेल', अशा शब्दात न्यायालयाने अलाहाबादियाला झापले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये रणवीर अलाहाबादियाने आईवडिलांबद्दल अश्लाघ्य विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त झाला. देशभरात अनेक गुन्हे त्याच्याविरोधात दाखल झाले. त्यानंतर रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अटकपूर्व जामीन आणि देशभरातील सर्व गुन्हे एकत्रित करण्यात यावे अशी मागणी त्याने याचिकेद्वारे केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने सुनावणी दरम्यान रणवीर अलाहाबादियाचे भाषेवरून कान पिळले.
रणवीर अलाहाबादियाचा सर्वोच्च न्यायालयाने घेतला वर्ग, काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, 'तुम्ही जे शब्द निवडले आहेत, ते ऐकूण आईवडिलांनाही लाज वाटेल, बहिणींनाही लाज वाटेल. संपूर्ण समाजाला लाज वाटेल. ही विकृत मानसिकता आहे. तुम्ही आणि तुमच्या लोकांनी ती विकृती दाखवली आहे."
"जर तुम्ही प्रसिद्धीसाठी अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत असाल, तर दुसरेही अशीच भाषा वापरतील आणि जीभ कापण्याचेही बोलतील", अशा शब्दात न्यायालयाने रणवीरला फटकारले.
तुम्हाला लाज वाटली पाहिजे -सर्वोच्च न्यायालय
रणवीर अलाहाबादियाच्या वकिलांना न्यायमूर्ती म्हणाले, "त्याला लाज वाटली पाहिजे की, त्याने आईवडिलांसोबत काय केले आहे? आपण आयव्हरी टॉवर व्यवस्थेत राहत नाहीत आणि आम्हाला माहिती आहे की, कोणत्या शोमधून हे चोरण्यात आले आहे."
न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह म्हणाले, "मला विश्वास हे की, जर पोलिसांनी तुम्हाला चौकशीसाठी बोलवले आहे, तर ते तुम्हाला सुरक्षाही देतील आणि त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही."
रणवीरच्या वकिलांना बोलताना न्यायालय म्हणाले, "त्याने पूर्णपणे विकृत भाषेचा वापर केला आहे आणि अशा प्रकरणात कायदा त्याचं काम करेल. आम्ही धमक्याचा विरोध करतो. पण कायद्याला त्याचं काम करू द्या. अश्लिलता आणि अनैतिकता यांचे मापदंड काय आहेत?", असा सवालही न्यायालयाने केला.
'त्याच्या डोक्यात घाण आहे', सर्वोच्च न्यायालय
सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय रणवीर अलाहाबादियाबद्दल त्याच्या वकिलांना म्हणाले, "असे दिसतेय की, त्याच्या डोक्यात काही घाण भरलेली आहे आणि त्यामुळेच त्याने शोमध्ये अशा प्रकारचे विधान केले. अशा प्रकारच्या वर्तणुकीची निंदा केली गेली पाहिजे. हे सहन करता कामा नये. फक्त यासाठी की स्वतःला असे समजतो की तो खूप प्रसिद्ध आहे आणि कोणतेही शब्द बोलू शकतो. मग तो संपूर्ण समाजाला हलक्यात घेत आहे का? पृथ्वीवर कुणी आहे का, ज्याला ही भाषा आवडेल?", असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला.
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कोणालाही सामाजिक मूल्यांच्या विरोधात काहीही बोलण्याची मोकळीक नाहीये. समाजाचे स्वतःचे काही मूल्ये आहेत. समाजाचे आपली कक्षा आहे आणि तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे", अशा शब्दात न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला खडसावले.