Lok Sabha Elections ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने देशभरातील विरोधी पक्षांची एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली असून या आघाडीच्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजपसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. पक्षाची प्रचारयंत्रणा किती ताकदीने राबवली जाते, यावर निवडणुकांमधील यश-अपयश अवलंबून असते. मात्र असं असताना काँग्रेसला एक धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार असलेल्या सुनील कनुगोलू यांनी लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा होणाऱ्या महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांवर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं पक्षाला कळवल्याची माहिती आहे.
काँग्रेसला कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशात पक्षाच्या नेत्यांसोबतच निवडणूक रणनीतीचं काम पाहणाऱ्या सुनील कनुगोलू यांचा मोठा वाटा राहिला आहे. याच कनुगोलू यांच्या टीमकडे काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची प्रचारयंत्रणा राबवण्याचं काम दिलं होतं. मात्र आपण महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं कनुगोलू यांनी आता पक्षाला सांगितले असल्याचे समजते. सुनील कनुगोलू हे काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारयंत्रणेचा भाग नसल्याने पक्षासाठी हा काही प्रमाणात धक्का आहे, असं मत काँग्रेसच्या एका राष्ट्रीय सचिवाने व्यक्त केलं आहे. याबाबत 'एनडीटीव्ही'ने वृत्त दिलं आहे.
एकीकडे, आपल्या कुशल निवडणूक रणनीतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांची २०२२ मध्ये काँग्रेससोबत सुरू असलेली चर्चा फिस्कटली होती. पक्षात आपली भूमिका नक्की काय असणार, याबाबत काँग्रेस नेतृत्त्वासोबत मतभेद झाल्याने प्रशांत किशोर यांनी काँग्रससोबत येण्यास नकार दिला. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांच्याच तालमीत तयार झालेल्या आणि काँग्रेसच्या दोन मोठ्या विजयांचे शिल्पकार ठरलेले सुनील कनुगोलू हेदेखील काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारयंत्रणेत काम करणार नसल्याने काँग्रेससमोरचे आव्हान आणखीनच कठीण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुनील कनुगोलू हे काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीत काम करणार नसले तरी महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काम करणार असल्याने राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यास मदत होणार आहे.