बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:44 IST2025-11-07T17:44:34+5:302025-11-07T17:44:54+5:30
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग थेट राजधानी बेंगळुरूपर्यंत पोहोचली आहे. प्रति टन ३,५०० रुपये दराच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर कारखानदारांनी देऊ केलेला ३,२०० रुपयांचा दर त्यांनी धुडकावून लावला आहे.

बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
बेळगाव : बेळगाव आणि बागलकोटसह उत्तर कर्नाटकातऊस दरासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आज आठव्या दिवशीही सुरूच आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मदतीसाठी केंद्र सरकारचा दरवाजा खटखटावला असून आज सायंकाळी बेळगावमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बेळगावजवळील हत्तरगी टोलनाक्यावर संतप्त शेतकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग थेट राजधानी बेंगळुरूपर्यंत पोहोचली आहे. प्रति टन ३,५०० रुपये दराच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर कारखानदारांनी देऊ केलेला ३,२०० रुपयांचा दर त्यांनी धुडकावून लावला आहे. या संघर्षामुळे राज्यातील तब्बल २६ साखर कारखान्यांचे गाळप पूर्णपणे ठप्प झाले आहे. शुक्रवारी होणारा राष्ट्रीय महामार्ग रोको तात्पुरता मागे घेण्यात आला असल्याची घोषणा रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली होती. तरीही अनेक आंदोलक शेतकरी महामार्ग रोखण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दगडफेकीला सुरुवात केली.
रस्तायावर थांबविलेल्या गाड्यांवरही या शेतकऱ्यांनी दगडफेक केली. पोलिसांना या आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना आवरण्यासाठी धरपकड सुरु केली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
केंद्राकडे मुख्यमंत्र्यांचा रोख...
सिद्धरामय्या यांनी या आंदोलनावरून केंद्रावर टीका केली आहे. “एफआरपी दर निश्चित करणे आणि साखर निर्यात थांबविण्याचे अधिकार केंद्राकडे आहेत. केंद्राच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.”, असे ते म्हणाले आहेत.