राजौरीमध्ये भारतीय लष्कराने असा उधळला आत्मघाती हल्ला, अन्यथा झाली असती उरीची पुनरावृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 00:01 IST2022-08-12T00:01:05+5:302022-08-12T00:01:19+5:30
Indian Army: जम्मूमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका तळावर गुरुवारी पहाटे झालेला आत्मघातकी हल्ला जवानांनी शौर्याची पराकाष्ठा करत उधळून लावला.

राजौरीमध्ये भारतीय लष्कराने असा उधळला आत्मघाती हल्ला, अन्यथा झाली असती उरीची पुनरावृत्ती
जम्मू - जम्मूमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका तळावर गुरुवारी पहाटे झालेला आत्मघातकी हल्ला जवानांनी शौर्याची पराकाष्ठा करत उधळून लावला. जर दहशतवादी आपल्या इराद्यांमध्ये यशस्वी झाले असते तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. मात्र या दहशतवादी हल्ल्यात सहा जवान जखमी झाले. त्यापैकी तीन जणांना हौतात्म्य आले. दरम्यान, जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना चार तास चाललेल्या एन्काऊंटरनंतर कंठस्नान घातले.
याबाबत अधित माहिती देताना पीआरओ (संरक्षण) जम्मू लेफ्टिनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, राजौरीमधील परघल येथे लष्कराच्या चौकीमधील सतर्क सुरक्षा रक्षकांनी आत्मघातकी हल्ला उधळून लावला. यापूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ कोजी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले होते.
कर्नल आनंद यांनी सांगितले की, खराब हवामान आणि हिरवळीचा फायदा घेत दोन संशयित लष्कराच्या चौकीजवळ पोहोचले होते. मात्र सतर्क असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना येण्याचे कारण विचारले. मात्र या दोघांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच ग्रेनेड फेकले. यादरम्यान, सुरक्षा रक्षक आणि सैनिकांनी घेराव घातला आणि दहशतवाद्यांना पुकारले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले. मात्र या चकमकीत सुभेदार राजेंद्र प्रसाद (राजस्थान), रायफलमॅन लक्ष्मण डी. (तामिळनाडू) आणि रायफलमॅन मनोज कुमार (हरियाणा) यांना वीरमरण आले.