महिला सक्षमीकरणासाठीचा यशस्वी प्रयत्न (मागे डोकावताना )

By Admin | Updated: April 10, 2015 23:29 IST2015-04-10T23:29:59+5:302015-04-10T23:29:59+5:30

नामदेव मोरे

Successful efforts for women empowerment (backing up) | महिला सक्षमीकरणासाठीचा यशस्वी प्रयत्न (मागे डोकावताना )

महिला सक्षमीकरणासाठीचा यशस्वी प्रयत्न (मागे डोकावताना )

मदेव मोरे
नवी मुंबई : महापालिकेच्या योजना विभागाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. पाच हजारपेक्षा जास्त बचत गट तयार केले आहेत. सिडकोने सुरू केलेल्या शिवणक्लास वर्गांना पालिकेने आयटीआयशी संलग्न करून अद्ययावत प्रशिक्षण सुरू केले. या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील अनेकांना रोजगार मिळाला आहे.
महानगरपालिका प्रत्येक वर्षी रस्ते, पदपथ व इतर विकासकामांवर करोडो रुपये खर्च करते. मोठे प्रकल्प व योजनांवर सर्वांचे लक्ष केंद्रित होत असते. परंतु पालिकेच्या योजना विभागाच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. पाच हजारपेक्षा जास्त बचत गट तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून ५० हजारपेक्षा जास्त महिला संघटित झाल्या आहेत. याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून मोफत शिवणक्लास वर्ग चालविले जात आहेत. सिडकोने वाशीतील समाज मंदिरामध्ये महिलांसाठी हे वर्ग सुरू केले होते. मात्र देखभालीसाठी कोणी नसल्यामुळे हे प्रशिक्षण केंद्र योग्यप्रकारे चालत नव्हते. समाज मंदिर महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर योजना विभागाने या प्रशिक्षण केंद्राचे पुनरुज्जीवन करण्याचे निश्चित केले. यानुसार साधारणत: २००७ मध्ये या ठिकाणी अत्याधुनिक शिवणक्लासचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. हे केंद्र आयटीआयशी संलग्न करण्यात आले आहे. तीन प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असून त्यामध्ये प्रत्येकी ५० महिलांना प्रवेश दिला जात आहे. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. शहरातील झोपडप˜ी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील महिलांसाठी खूप मोठा आधार मिळू लागला आहे. येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेक महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले आहे.
पालिकेची स्थापना झाल्यानंतर अडगळीत पडलेल्या योजना विभागाने २० वर्षांमध्ये शहरातील हजारो वंचित घटकांना मदत उपलब्ध करून दिली आहे. शिवणक्लास हा फक्त त्याचा एक छोटासा भाग आहे. या व्यतिरिक्त कामगार, एकपालकत्व असणार्‍या मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. महिलांना शिलाई मशिनसह अनेक प्रकारची यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. पालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलांना सायकल वाटप केले जात आहे. विधवा महिलेच्या मुलीच्या लग्नासाठीही पालिका मदत करत आहे. पालिकेचे समूह संघटक प्रत्येक झोपडप˜ी व इतर ठिकाणी फिरून पालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असून यामुळे महापालिकेविषयी सर्वसामान्यांमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे.

Web Title: Successful efforts for women empowerment (backing up)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.