लालूपुत्राला महागात पडला स्टंट; तेज प्रताप यादवांची सायकलयात्रा आपटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 15:22 IST2018-07-26T15:19:23+5:302018-07-26T15:22:02+5:30
पेट्रोल डिझेल दरांच्याविरोधात काढलेली ही सायकलयात्रा पाटण्यात चर्चेचा विषय झाली आहे.

लालूपुत्राला महागात पडला स्टंट; तेज प्रताप यादवांची सायकलयात्रा आपटली
पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पूत्र तेजप्रताप सध्या चांगलेच जोशात आहेत. कोठे गरिबा घरी जेवण कर तर सार्वजनिक बोअरपंपावर अंघोळ कर असले कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतले आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांच्या आधी आपल्या पक्षाची प्रतिमा सर्वव्यापी, सर्वसमावेशक व्हावी यासाठी तेजप्रताप यांचा आटापिटा सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणू काढलेली सायकलयात्रा तेजप्रताप यांना चांगलीच महागात पडली आहे.
जब साइकिल चलाते चलाते गिर पड़े तेज प्रताप यादव@yadavtejashwi @TejYadav14 @NitishKumar @laluprasadrjd @SushilModi @BJP4Bihar @IYCBihar #ViralVideo#tejprataptadav#biharpic.twitter.com/lJl7UR6ZL1
— Journalist Cafe (@journalist_cafe) July 26, 2018
त्याचं झालं असं तेजप्रताप यांनी सायकल यात्रा काढून पाटणा शहरात सायकल चालवायला सुरु केली. यावेळेस त्यांच्या आजूबाजूला राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्तेही होते. या यात्रेत अचानक काहीतरी मनात आलं आणि तेजप्रताप यांनी वेगात सायकल चालवायला सुरु केली. त्यांच्यापाठोपाठ राजद कार्यकर्त्यांनाही वेगात जावं लागलं. याच धांदलीमध्ये तेजप्रताप यादव सायकलवरुन खाली पडले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये रेकार्ड झाला असून त्याची क्लिप वायरल झाली आहे.
सायकलवर पडल्यावर तेजप्रताप लगेच उभेही राहिले मात्र तोपर्यंत सर्व प्रकार कॅमेराबद्ध झाला होता. तेजप्रताप हे सध्या अशाच प्रकारच्या मोहिमांमध्ये व्यग्र आहेत. पेट्रोल डिझेल दरांच्याविरोधात काढलेली ही सायकलयात्रा पाटण्यात चर्चेचा विषय झाली आहे.
अलीकडे त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्वत:च्या आगामी चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले होते. ‘रुद्रा द अवतार’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. या पोस्टरवर तेजप्रताप डॅशिंग अवतारात दिसतं आहेत. नेमक्या याच चित्रपटासाठी तेजप्रताप जिममध्ये घाम गाळत आहेत. त्यांच्या सोशल अकाऊंटवर म्हणूनच रोज नवा वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट होतोय. तूर्तास या चित्रपटाबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पण तेजप्रताप यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटाची कथा बिहारची आहे आणि बिहारमध्येच त्याचे शूटींग होणार आहे.
खरे तर वडिल राजकारणात असले तरी तेजप्रताप यांचा कल कायम अभिनयाकडेच राहिला. यापूर्वी बिहारचे आरोग्यमंत्री असताना त्यांनी एका भोजपुरी चित्रपटात मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. पण दुर्दैवाने तो चित्रपट रिलीज झाला नव्हता. आता मात्र तेजप्रताप यांनी जोरदार तयारी केली आहे. यावेळी कुठलीही माघार नाही, कुठलीही कसूर नाही, हेच जणू त्यांनी ठरवलेय. बॉलिवूडच्या हिरोंच्या रांगेत बसायचे म्हटल्यावर इतके करणे तर भाग आहे, होय ना?