वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 15:54 IST2025-11-09T15:53:41+5:302025-11-09T15:54:16+5:30
दरम्यान, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी विद्यार्थ्यांनी RSS गीत गाण्याचे समर्थन केले आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) गीत गायल्यानंतर, केरळ सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी लोकशिक्षण संचालकांना (DPI) तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की, ही घटना सरकार अत्यंत गंभीरतेने घेत आहे, असे शिवनकुट्टी यांनी म्हटले आहे.
शिवनकुट्टी म्हणाले, “शासकीय कार्यक्रमांमध्ये मुलांना राजकारणात ओढणे आणि विशिष्ट गटाच्या सांप्रदायिक अजेंड्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा वापर करणे, हे संविधानिक तत्त्वांचे उल्लंघन आहे.” तसेच, अहवालाच्या निष्कर्षांवरून पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच देशातील धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय मूल्यांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, अशेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी विद्यार्थ्यांनी RSS गीत गाण्याचे समर्थन केले आहे. ते त्रिशूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “हा मुलांच्या निरागस आनंदाचा भाग होता. त्यांनी स्वेच्छेने गाणे गायले, ते कोणतेही अतिवादी गाणे नाही.”
शनिवारी एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गीत सादर केले होते. यावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दक्षिण रेल्वेवर टीका करत, RSS सारख्या सांप्रदायिक संस्थेचे गीत शासकीय कार्यक्रमात सादर करणे, हे संविधानाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.
दरम्यान, वाद वाढल्यानंतर दक्षिण रेल्वेने संबंधित सोशल मीडिया पोस्ट हटवली होती. यानंतर, विद्यार्थ्यांनी गायलेल्या गीताचा व्हिडिओ आणि त्याचा इंग्रजी अनुवाद रविवारी पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला. तसेच त्यासोबत, ‘सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एर्नाकुलम -बेंगलोर वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी आपल्या शालेय गीत चांगल्या पद्दतीने प्रस्तुत केले’, असेही लिहिले.