दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका
By Admin | Updated: May 30, 2014 03:18 IST2014-05-30T03:18:47+5:302014-05-30T03:18:47+5:30
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले

दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका
नविन सिन्हा, नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. सिंह यांनी गुरुवारी मंत्रालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नक्षलवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले. राजनाथ सिंह यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच गृह सचिव अनिल गोस्वामी व वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. गोस्वामी यांनी गृहमंत्रालयासमोरील आव्हाने, दहशतवाद, नक्षली कारवाया, पोलीस दलाचे आधुनिकीकरण याबाबत पॉवर पॉईंटद्वारे सादरीकरण केले. ही बैठक तब्बल चार तास चालली. दहशतवाद तसेच नक्षली कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुप्तचर संस्थांच्या बळकटीकरणाची गरज गृहमंत्र्यांनी अधोरेखित केली. आयबी (इंटेलिजन्स ब्युरो), एनआयएच्या (नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी) आधुनिकीकरणासह देशातील महत्त्वाच्या राज्यांतील एटीएस (अॅण्टी टेररिस्ट स्कॉडस्) यंत्रणांबाबतही त्यांनी जाणून घेतले. गृहमंत्रालय देशांतर्गंत सुरक्षेव्यतिरिक्त पाकिस्तान, चीन, भूतान, नेपाळ आणि बांगला देशलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडते. सरदार पटेल यांचे देशाच्या एकात्मतेसाठी मोठे योगदान आहे. त्यांनी जे काही केले, त्याची परतफेड केली जाऊ शकत नाही. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो, असे राजनाथसिंग म्हणाले.