आंध्र प्रदेशमध्ये महिलांसाठी नुकत्याच सुरू झालेल्या ‘स्त्री शक्ती’ मोफत बस प्रवास योजनेला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी, या योजनेच्या अंमलबजावणीनंतर एकाच दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांनी बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला असून, हा एक नवा विक्रम ठरला आहे.
राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून सुरू केलेल्या या योजनेने महिलांना मोठा दिलासा दिला आहे. आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून महिला, मुली आणि तृतीयपंथीयांना मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सरकारचा हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करत राज्यातील महिलांसाठी मोफत बस प्रवासाची योजना सुरू केली. स्वातंत्र्यदिनी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत, पहिल्याच कामकाजाच्या दिवशी म्हणजे सोमवारी १८ लाखांहून अधिक महिलांनी मोफत बस प्रवासाचा लाभ घेतला. हा आकडा सरकारच्या अंदाजित आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे. अवघ्या चार दिवसांत राज्यभरातील ४७ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, असेही सांगितले जात आहे. तसेच योजनेंतर्गत राज्यातील लाखो महिला प्रवासी दररोज पैसे वाचवत असल्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले. सांगितले.
या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळण्यासोबतच, त्यांना शिक्षण, नोकरी आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्यास प्रोत्साहन मिळाले. ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.