UP Police:उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका कथावाचकाचे एखाद्या घटनात्मक पदावरील व्यक्तीप्रमाणे 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन स्वागत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप झाला असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
बहराइचच्या पोलीस लाईनमध्ये ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. कथावाचक पुंडरीक गोस्वामी जेव्हा पोलीस परेड ग्राउंडवर पोहोचले, तेव्हा त्यांच्यासाठी चक्क रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. इतकेच नाही तर गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अधिकृत गार्ड ऑफ ऑनर दिला आणि सलामी दिली. नियमानुसार, असा सन्मान केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल किंवा उच्च घटनात्मक पदावरील व्यक्तींनाच दिला जातो.
राजकीय नेत्यांचा संताप
हा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. खासदार चंद्रशेखर आझाद यांनी, "भारत हा मठ नसून घटनात्मक गणराज्य आहे. राज्याची सत्ता ही कोणत्या धर्माची जहागीर नाही. हा केवळ प्रशासकीय गलथानपणा नसून संविधानावर उघड हल्ला आहे," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तर "जेव्हा संपूर्ण पोलीस दल सलामी देण्यात व्यस्त राहील, तेव्हा राज्यातील गुन्हेगार मस्त राहतील. भाजप राजवटीत गुन्हेगारीवर लगाम लावण्याऐवजी सलाम-सलामचा खेळ सुरू आहे," असा टोला अखिलेश यांनी लगावला.
बहराइच पोलिसांचे उत्तर
वादावर पडदा टाकण्यासाठी बहराइच पोलिसांनी विचित्र स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांनी म्हटले की, "कामाच्या तणावामुळे २८ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. पोलिसांचे नैराश्य आणि तणाव दूर करण्यासाठी पुंडरीक गोस्वामी यांना मार्गदर्शनासाठी बोलावले होते. त्यांच्या व्याख्यानामुळे पोलिसांचे मनोबल वाढले," असं पोलिसांनी सांगितले. मात्र, तणाव दूर करण्यासाठी सलामी देण्याची गरज काय होती, याचे उत्तर पोलिसांकडे नाही.
पोलीस महासंचालकांनी मागितले स्पष्टीकरण
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक राजीव कृष्ण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "परेड ग्राउंडचा वापर केवळ अधिकृत सराव आणि शिस्तीसाठीच व्हायला हवा," असे सांगत त्यांनी बहराइचच्या एसपींकडून लेखी स्पष्टीकरण मागवले आहे.
Web Summary : UP police honored a storyteller with a guard of honor and red carpet, sparking controversy. Opposition leaders, including Akhilesh Yadav, criticized the government, calling it a constitutional overreach. An explanation was demanded from Bahraich SP.
Web Summary : यूपी पुलिस ने एक कथावाचक को गार्ड ऑफ ऑनर और रेड कार्पेट से सम्मानित किया, जिससे विवाद खड़ा हो गया। अखिलेश यादव सहित विपक्षी नेताओं ने सरकार की आलोचना करते हुए इसे संवैधानिक उल्लंघन बताया। बहराइच एसपी से स्पष्टीकरण मांगा गया।