संसदेत गुरुवारी झालेल्या धक्काबुक्कीमुळे वातावरण चांगलंच तापलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र यावर आता राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्हाला आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आणि तिथे धक्काबुक्की केल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही मकरद्वारमधून संसदेच्या आत जात होतो. भाजपाचे लोक तिथे उभे होते आणि आम्हाला आत जाण्यापासून रोखत होते. घटनास्थळी धक्काबुक्की होऊ लागले आणि लोक खाली पडले. हे लोक संविधानावर आक्रमण करून आंबेडकरांचा अपमान करत आहेत. मुख्य मुद्दा म्हणजे ते संविधानावर आक्रमण करत आहेत.
भाजपा खासदारांनी त्यांना एंट्री गेटवर थांबवल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. ते मला धक्काबुक्की आणि धमक्या देत होते. आम्ही पायऱ्यांवर उभे होतो. सर्व काही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं राहुल सांगतात. खरगे यांनाही धक्काबुक्की झाली. धक्काबुक्कीने आम्हाला काही होत नाही. भाजपाचे खासदार आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत असंही म्हटलं.
राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला आणि तो खासदार येऊन माझ्यावर पडला, त्यामुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली, असा आरोप भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला आहे. तर दुसरीकडे वायनाडच्या खासदार आणि राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी म्हणाल्या की, खरगे यांना देखील धक्काबुक्की झाली आहे. सर्व काही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.