आसाममध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन् गोळीबार, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:12 IST2025-07-17T13:09:05+5:302025-07-17T13:12:10+5:30
आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील पैकनजवळ झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

आसाममध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन् गोळीबार, एकाचा मृत्यू
आसाममधील गोलपारा येथील पैकन भागात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान प्रचंड हिंसाचार झाला. ही घटना आज सकाळी घडली. अतिक्रमण केलेली जमीन हटवण्यासाठी प्रशासन येथे पोहोचले होते. त्यावेळी अचानक स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी गोळीबार केला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैकण परिसरात बऱ्याच काळापासून बेकायदेशीर कब्जे होते आणि प्रशासनाने तेथील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
कारवाई सुरू होताच जमावाने निषेध तीव्र केला आणि दगडफेक सुरू केली आणि काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला, पण जमाव अधिक हिंसक झाल्यावर झालेल्या गोळीबारात एका स्थानिकाचा जागीच मृत्यू झाला. सध्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि परिस्थिती तणावपूर्ण आहे. प्रशासनाने घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.