२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:02 IST2025-04-11T12:42:27+5:302025-04-11T13:02:39+5:30
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणल्यानंतर पंतप्रधान मोदींची जुनी पोस्ट व्हायरल होत आहे.

२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल
PM Modi Old Post On Tahawwur Rana: मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर हुसेन राणा याला अखेर १६ वर्षांनी भारतात आणण्यात आलं आहे. कोर्टाने तहव्वुर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा तहव्वुर राणाकडे मुंबई दहशतवादी हल्ल्याची कसून चौकशी करणार आहे. आता तहव्वुर राणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींनी तहव्वुर राणावर भाष्य केलं होतं.
मुंबईत २६/११ दहशतवादी हल्ल्यातून दहशत माजवणाऱ्या तहव्वुर राणाला बऱ्याच प्रयत्नानंतर भारतात आणण्यात आलं आहे. तहव्वुर राणा भारतात येताच, २०११ मध्ये नरेंद्र मोदींनी केलेले एक विधान खूप चर्चेत आहे. पंतप्रधान मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी शिकागो न्यायालयाने तहव्वुर राणाला निर्दोष सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला होता आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर टीका केली होती.
२०११ मध्ये, अमेरिकेने राणाला मुंबई हल्ल्यातील सहभागाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. मात्र हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी गटाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला दोषी ठरवले होते. यावर, तत्कालीन यूपीए सरकारच्या परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. "मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा याला निर्दोष घोषित करणे हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे आणि ते परराष्ट्र धोरणाचे मोठे अपयश आहे," असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी केले होते.
US declaring Tahawwur Rana innocent in Mumbai attack has disgraced the sovereignty of India & it is a “major foreign policy setback”
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2011
मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना अमेरिकेने कोणत्या आधारावर निर्दोष घोषित केले, असा प्रश्हीन पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला होता. मुंबई दहशतवादी घटनेतील पीडितांना न्याय हवा आहे. ९/११ च्या गुन्हेगारांचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका भारताला हे करू देईल का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर आता २०११ च्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. तहव्वुर राणाला भारतात आणल्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
"आज अमेरिकेच्या शिकागो न्यायालयात दहशतवादी राणाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेने दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी, प्रत्येक शक्तीसाठी एक नवीन प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना निर्दोष घोषित करण्याचे धाडस शिकागो न्यायालयाने कोणत्या आधारावर केले? तपास कोणी केला? जिथे ही घटना घडली त्या लोकांची भूमिका काय होती? इथे बळी पडलेल्यांना न्याय कोण देणार? देशाचे पंतप्रधान (मनमोहन सिंग) हे अमेरिकेचे मित्र मानले जातात. ते असताना ही एकतर्फी कारवाई कशी केली जात आहे? आणि आज शिकागो न्यायालयात जे घडले आहे त्यावरून हे स्पष्ट झालं की आता भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या सर्व दहशतवादी त्यांचे सर्व खटले अमेरिकन न्यायालयात चालवले जाणार असं वाटतंय. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा आहे की,९/११ च्या दोषींचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका यासाठी परवानगी देईल का? अमेरिकेतील ९/११ च्या घटनेसाठी भारताची न्यायव्यवस्था जबाबदार असेल का?, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.