स्थायी समिती सभापतींचे पद धोक्यात जात प्रमाणपत्र समितीची नोटीस : १६ जानेवारीला होणार सुनावणी
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
नवी मुंबई: महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांना जातीचे प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस सोलापूरच्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली आहे. याविषयी लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील सुनावणी १६ जानेवारीला होणार आहे.
स्थायी समिती सभापतींचे पद धोक्यात जात प्रमाणपत्र समितीची नोटीस : १६ जानेवारीला होणार सुनावणी
नवी मुंबई: महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांना जातीचे प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस सोलापूरच्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली आहे. याविषयी लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील सुनावणी १६ जानेवारीला होणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नगरसेवक व सलग दोन वर्षे स्थायी समितीचे सभापतीपद भूषविलेले सुरेश कुलकर्णी तुर्भे स्टोअर प्रभाग ४२ मधून निवडून आले आहेत. त्यांनी सादर केलेले वडार जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष जाधव यांनी २०१० मध्ये उच्च न्यायालयात केली होती. जून २०१४ मध्ये न्यायालयाने त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्याची छाननी करण्यासाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १ सोलापूर यांच्याकडे पाठविले होते. याविषयी संबंधित विभागाकडे चौकशी सुरू होती. दक्षता पथकाने सर्व कागदपत्रांची छाननी केली. कुलकर्णी यांनी सादर केलेल्या तुर्भे येथील शाळेच्या दाखल्याची पडताळणी केली असता १९७३ ते ७९ दरम्यान कोणताही अभिलेख शाळेतून उपलब्ध झालेला नाही. यामुळे सदर दाखला खरा असल्याचा पुरावा दिसत नाही. कुलकर्णी यांच्या वडिलांच्या सोलापूर पालिका शाळेतील दाखल्याची छाननी केली असता तो पुरावा बनावट व खोटा असल्याचे समितीचे मत झाले आहे. जातप्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी कुलकर्णी यांनी १२ जणांचे शालेय पुरावे , खरेदी खत, गहाण खत व इतर कागदपत्रे सादर केली आहेत. परंतु संबंधितांशी असलेल्या नातेसंबंधाविषयी कागदोपत्री पुरावा समितीसमोर सिद्ध करावा असे मत व्यक्त केले आहे. सन १९६१ पूर्वीचे वडार जातीचे सबळ व ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. यामुळे १२ डिसेंबरला समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जातीच्या वैधतेबाबत पुरावे सादर करण्याची जबाबदारी संबंधितांची असल्यामुळे तुमचे वडार जातीचे प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये याविषयी लेखी खुलासा करण्यात यावा असे मत व्यक्त केले आहे. याविषयी पुढील सुनावणी १६ जानेवारी २०१५ ला होणार आहे. या सुनावणीस उपस्थित न राहिल्यास उपलब्ध कागदपत्रांवरून अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. चौकटकुलकर्णी नॉट रिचेबल जाती प्रमाणपत्र समितीने नोटीस व दक्षता पथकाचा चौकशी अहवाल सुरेश कलकर्णी यांच्या पत्त्यावर पाठविला आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. फोटो१२ सुरेश कुलकर्णी, नावाने आहे.