New Delhi Railway Station Stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. यासाठी देशभरातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून लोक तेथे जात आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल आहे. यात ३ मुलांचाही समेश आहे. याशिवाय १० लोक गंभीर जखमी असल्याचेही समजते. अचानक रात्री ८ वाजता प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. प्लॅटफॉर्म क्रमांक १४-१६ वर ही घटना घडल्याचे समजते.
यासंदर्भात, एलएनजेपी रुग्णालयाने मृत्यूंची पुष्टी केली आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, १४ जणांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन गाड्या लेट झाल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढली. आता प्रयागराजसाठी दोन विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. याशिवाय, लवकरच आणखी काही विशेष गाड्या चालवल्या जातील अशी चर्चा आहे.
या घटनेसंदर्भात बोलताना सीपीआरओ उत्तर रेल्वेने म्हटले आहे की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कसल्याही प्रकारची चेंगराचेंगरी झालेली नाही. ही केवळ अफवा आहे. उत्तर रेल्वे प्रयागराजसाठी दोन विशेष गाड्या चालवत होती." रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गाड्या का लेट झाल्या आणि पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती की नाही? या संपूर्ण घटनेची चौकशी रेल्वे अधिकारी करत आहेत.
दरम्यान कुंभमेळ्यात रोज लाखो लोक संगमावर स्नानासाठी जात आहेत. यामुळे प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे.