श्रीलंकेच्या नौदलाचा भारतीय मच्छीमारांवर गोळीबार, ५ जखमी, पैकी दोन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:26 IST2025-01-28T16:24:44+5:302025-01-28T16:26:18+5:30
मंगळवारी सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने हे कृत्य केले आहे. या घटनेत पाच मच्छीमार जखमी झाले आहेत.

श्रीलंकेच्या नौदलाचा भारतीय मच्छीमारांवर गोळीबार, ५ जखमी, पैकी दोन गंभीर
भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्यावर गोळीबार केल्याची विकृत घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. या घटनेचा निषेध म्हणून भारताने श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना बोलविले आहे.
मंगळवारी सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने हे कृत्य केले आहे. या घटनेत पाच मच्छीमार जखमी झाले आहेत. तर यापैकी दोन मच्छीमारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेला औपचारिक विरोध दर्शविण्यासाठी भारत सरकारने श्रीलंकेच्या कार्यवाहू उच्चायुक्तांना पाचारण केले आहे.
श्रीलंकन नौदलाचे हे कृत्य अस्वीकारार्ह्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आज पहाटे डेल्फ्ट बेटाजवळ १३ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेताना श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबाराची माहिती आपल्याला मिळाली आहे. मासेमारी बोटीवरील १३ मच्छिमारांपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे आणि सध्या त्यांच्यावर जाफना शिक्षण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.