नवी दिल्ली : हरयाणाची ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती दिल्याच्या प्रकरणात पकडलेल्या सहा भारतीय नागरिकांमध्ये तिचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास हिसार येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेली ज्योती 'ट्रॅव्हल विथ जो' नावाची युट्यूब चॅनल चालवते. ज्योतीने २०२३ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. या काळात तिची भेट पाकिस्तान उच्चायुक्ताचा कर्मचारी एहसान-उर-रहीम ऊर्फ दानीशशी झाली. त्याच्याशी तिचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. दानीशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंटांशी झाली. यांत अली अहसन व शाकीर ऊर्फ राणा शाहबाज यांचा समावेश होता. दानीश, अली अहसन यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली.