दिल्लीत आम आदमी पक्षात फूट, १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:35 IST2025-05-18T13:35:24+5:302025-05-18T13:35:34+5:30
मोलारबँडचे नगरसेवक हेमचंद गोयल यांच्या अध्यक्षतेखाली १५ नगरसेवकांची बैठक झाली. यात आपपासून वेगळे होत नवीन पक्ष स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दिल्लीत आम आदमी पक्षात फूट, १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा
चंद्रशेखर बर्वे -
नवी दिल्ली : आपच्या १५ नगरसेवकांनी बंडखोरी केली असून त्यांनी शनिवारी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. दिल्ली महानगरपालिकेतील आपच्या १५ नगरसेवकांनी एकाच वेळी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. आदर्शनगरचे नगरसेवक मुकेश गोयल यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रप्रस्थ विकास पार्टी बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोलारबँडचे नगरसेवक हेमचंद गोयल यांच्या अध्यक्षतेखाली १५ नगरसेवकांची बैठक झाली. यात आपपासून वेगळे होत नवीन पक्ष स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
तिसरी आघाडी बनविणार
बंडखोर नगरसेवकांनी हेमचंद गोयल यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. आपचा राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांमध्ये दिनेश कुमार, हिमानी जैन, रुनाक्षी शर्मा, उषा शर्मा, अशोक पवार, राखी यादव, साहिब कुमार, राजेश कुमार लाडी, मनीषा कालरा, सुमानी अनिल, अशोक कुमार पांडे, मुकेश गोयल, देवेंद्र कुमार, हेमचंद गोयल आणि रानी खेडा यांचा समावेश आहे.