Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:26 IST2026-04-07T12:23:55+5:302026-04-07T12:26:25+5:30
कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील ताडियांडामोल डोंगरावर ट्रेकिंगदरम्यान बेपत्ता झालेली केरळची शरण्या तीन दिवसांनंतर रविवारी जिवंत सापडली.

Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील ताडियांडामोल डोंगरावर ट्रेकिंगदरम्यान बेपत्ता झालेली केरळची शरण्या तीन दिवसांनंतर रविवारी जिवंत सापडली. हत्तींचा वावर असलेल्या या घनदाट जंगलात शरण्या गुरुवारी रस्ता चुकली होती. तीन दिवसांपर्यंत ती जंगलात सतत चालत राहिली. तिच्याकडे फक्त अर्धा लीटर पाणी होतं आणि मोबाईलची बॅटरीही संपली होती. अशा कठीण परिस्थितीतही तिने कमालीची हिंमत दाखवली. जंगलातील काळोखी रात्र तिने कशीबशी घालवली.
अखेर रविवारी पहाटे ५.३० वाजता ती जंगलातील एका निर्जन मंदिरात सापडली. परिसरातील आदिवासींनी बचाव पथकाला तिच्याबद्दल माहिती दिली होती. सुटकेनंतर ३६ वर्षीय शरण्याने सांगितलं की, "मी रस्ता चुकले होते, पण मला कधीच भीती वाटली नाही." केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील नाडापुरम येथील रहिवासी असलेली शरण्या एक आयटी प्रोफेशनल आहे. रविवारी रेस्क्यू झाल्यानंतर तिने ग्रुपपासून ताटातूट झाल्याची आणि तीन दिवस जंगलात काढल्याची पूर्ण गोष्ट सांगितली.
A heartfelt moment, an emotional father hugs his daughter Sharanya a techie who had gone missing during a trek in Kodagu's Tadiyandamol, she was found after 4 days deep inside the forest area, she managed to survive by eating some of the items she had carried on her. pic.twitter.com/0xBJG0t35r
— Deepak Bopanna (@dpkBopanna) April 5, 2026
कोडागू जिल्ह्यात मोठी शोध मोहीम
शरण्या गुरुवारी ताडियांडामोलच्या जंगलात १५ लोक आणि एका गाईडसोबत चार किलोमीटर लांब ट्रेकवर निघाली होती. ताडियांडामोल हे १,७४८ मीटर उंचीवर असलेलं कर्नाटकचं तिसरं सर्वात उंच शिखर आहे. २ एप्रिल रोजी जेव्हा शरण्या बेस पॉईंटवर परतली नाही, तेव्हा कोडागू जिल्ह्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत थर्मल इमेजिंग ड्रोन, मोबाईल फोन ट्रॅकिंग आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली.
जंगलात कोणीतरी भेटेल या आशेने ती चालत राहिली
शरण्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ती डोंगरावरून खाली उतरली तेव्हा तिला कोणीच दिसलं नाही. फोनची बॅटरी संपण्यापूर्वी तिने एका सहकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. रस्ता चुकल्यानंतर पहिल्या दिवशी ती संध्याकाळी ६.४५ वाजेपर्यंत चालत राहिली. अंधार पडल्यानंतर ती एका नाल्यापाशी उघड्या जागेवर थांबली. जंगलात कोणीतरी भेटेल या आशेने ती सतत चालत राहिली. बचाव पथकाच्या सदस्यांनी सांगितलं की, शरण्या रविवारी जंगलाच्या अशा दुर्गम भागात सापडली जिथे सहसा कोणीही जात नाही.