भाजपसाठी दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:07 AM2021-05-03T02:07:40+5:302021-05-03T02:08:42+5:30

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्याशी युती करून ही निवडणूक लढविली

South victory gateway for BJP | भाजपसाठी दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार

भाजपसाठी दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार

Next

समीर इनामदार 

पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत एनडीएने काँग्रेसप्रणीत आघाडीचा पराभव करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयासह काँग्रेसने दक्षिणेतील आपले राज्य गमावले आहे. दक्षिणेकडे कूच करण्यासाठी भाजपने यापूर्वी केलेल्या युक्त्यांना यश आले आहे. हा विजय त्यांना दक्षिणेकडील विजयासाठी प्रवेशद्वार ठरणार आहे. ३० सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी १६ ही मॅजिक फिगर आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या एन. नारायणसामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले होते. केंद्राने या राज्यात नायब राज्यपाल म्हणून माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची नियुक्ती केली. त्यांनी तीन भाजप सदस्यांना लोकनियुक्त सदस्य म्हणून नियुक्त केले. त्यानंतर हे सरकार अस्थिर करून पाडण्यासाठी खेळी सुरू झाल्या. सरकार अल्पमतात आल्यानंतर नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर किरण बेदी यांना हटविण्यात आले. नंतर याठिकाणी निवडणुका झाल्या.

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्याशी युती करून ही निवडणूक लढविली. काँग्रेसने द्रमुक, व्हीसीके आणि भाकप यांच्याशी युती केली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसने १५, एआयएनआरसीने ८, अण्णाद्रमुकने चार, द्रमुकने दोन जागा जिंकल्या होत्या. एन. नारायणसामी निवडून आले नसताना त्यांना मुख्यमंत्री बनविण्यात आल्याने आमदार नाराज होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवारीही देण्यात आली नव्हती. मागील निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. राज्याची विधानसभा किती लहान आहे, हे भाजपसाठी महत्त्वाचे नसून, याचा लाभ भविष्यात कितपत होईल, याकडे लक्ष ठेवून त्यांनी केलेली खेळी यशस्वी ठरली आहे. भाजपला कर्नाटकच्या पुढे भाजपला जाता आले नाही. तामिळनाडू आणि केरळमध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे दक्षिणेकडे जाण्यासाठी मार्ग म्हणून पुदुच्चेरीला निवडण्यात आले. आता भाजपचे पुढील लक्ष्य तामिळनाडू असणार आहे. 

Web Title: South victory gateway for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.