Sonu sood :सोनू सूदविरोधात एफआयआर दाखल, मतदानाच्या दिवशी बहिणीचा प्रचार केल्याचा आरोप
By Parabhanihyperlocal | Updated: February 22, 2022 14:46 IST2022-02-22T14:33:23+5:302022-02-22T14:46:30+5:30
Sonu sood :सोनूची बहीण मालविका सूद-सच्चर मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. निवडणुकीत सोनूने मालविकासाठी खूप प्रचार केला होता.

Sonu sood :सोनू सूदविरोधात एफआयआर दाखल, मतदानाच्या दिवशी बहिणीचा प्रचार केल्याचा आरोप
मोहाली: पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान सोनू सूद मतदान केंद्रावर दिसल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याची कार जप्त केली होती. त्यानंतर आता सोनू सूदविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर मतदानाच्या दिवशी मोगातील लांडेके गावात बहिणीसाठी प्रचार केल्याचा आरोप आहे. सोनूविरोधात कलम-188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सोनू सध्या दक्षिण आफ्रिकेत एका इव्हेंटसाठी गेला आहे.
सोनूची कार जप्त
सोनूची बहीण मालविका सूद-सच्चर मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सोनू मतदारांवर प्रभाव टाकत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याला मोगा येथील मतदान केंद्रावर जाण्यास मनाई केली होती. पण, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात गेल्यामुळे पोलिसांनी सोनूची कार जप्त केली होती.
सोनूची प्रतिक्रिया
सोनूने मात्र मतदान केंद्रावर निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. एएनआयशी बोलताना सोनू म्हणाला, “आम्हाला विरोधकांकडून अनेक धमकीचे फोन आले होते. अनेक बूथवर पैसेही वाटले जात होते, त्यामुळे निवडणूक योग्य पद्धतीने पार पडली आहे का, हे पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यानंतर आता सोनूविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यावर अद्याप सोनूची प्रतिक्रिया आलेली नाही.
सोनूचे आगामी चित्रपट
सोनू आगामी काळात आचार्य, थमिलरासन या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो पृथ्वीराज आणि फतेह या हिंदी चित्रपटांमध्येही दिसणार आहे. पृथ्वीराजमध्ये सोनूसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.