काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांच्या नोंदींवरून निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपानेहीकाँग्रेसला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. सोनिया गांधी ह्या भारताच्या नागरिक बनण्यापूर्वीच तीन वर्षे आधी त्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं, असा आरोप भाजपाने केला आहे. इटलीमध्ये जन्मलेल्या सोनिया गांधी यांनी १९८३ साली भारताचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. मात्र १९८० सालीच त्यांच्या नावाचा मतदार यादीत समावेश झाला होता, असा आरोप भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे.
तर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी १९८० सालच्या एका मतदार यादीची कॉपी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात दिल्ली लोकसभा मतदारसंघातील सफदरजंग रोड येथील मतदान केंद्र क्रमांक १४५ च्या मतदार यादीमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी आमि मनेका गांधी यांच्या नावांची नोंद आहे. मतदार यादीत नाव नोंदवलं गेलं तेव्हा सोनिया गांधी ह्या इटलीच्या नागरिक होत्या, असा दावाही अमित मालवीय यांनी केला.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमित मालवीय पुढे म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर १९८२ साली सोनिया गांधी यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आलं. मात्र जानेवारी महिन्यात त्यांचं नाव पुन्हा एकदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं. हे सुद्धा नियमांचं उल्लंघन होतं. कारण त्यावेळी सुद्धा सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व हे एप्रिल १९८३ मध्ये मिळालं होतं. तर मतदार नोंदणीसाठी निश्चित करण्यात आलेली शेवटची तारीख ही १ जानेवारी १९८३ ही होती.
दरम्यान भाजपा नेत्यांनी केलेल्या आरोपांनुसार भारताचं नागरिकत्व नसतानाही सोनिया गांधी यांचं नाव दोन वेळा मतदार यादीमध्ये नोंदवलं गेलं. निवडणुकीत झालेल्या गडबडीचं हे स्पष्ट उदाहरण आहे. राजीव गांधी यांच्याशी विवाह केल्यानंतर सुमारे १५ वर्षे सोनिया गांधी यांनी भारताचं नागरिकत्व का स्वीकारलं नव्हतं? असा सवालही भाजपा नेत्यांनी उपस्थित केला.