सोनिया गांधींचा 'तो' निर्णय चुकला - मौलाना असरारुल हक
By Admin | Updated: June 2, 2014 11:59 IST2014-06-02T11:58:18+5:302014-06-02T11:59:09+5:30
'निवडणुकीपूर्वी सोनिया गांधींनी जामा मस्जिदच्या शाही इमामांची भेट घेण्याचा निर्णय चुकला' असे परखड मत मांडत काँग्रेसचे खासदार मौलाना असरारुल हक यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

सोनिया गांधींचा 'तो' निर्णय चुकला - मौलाना असरारुल हक
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २ - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वावर पक्षांतर्गत हल्ले वाढत असून राहुल गांधींपाठोपाठ आता सोनिया गांधींवर काँग्रेसच्या एका खासदाराने टीका केली आहे. 'निवडणुकीपूर्वी सोनिया गांधींनी जामा मस्जिदच्या शाही इमामांची भेट घेण्याचा निर्णय चुकला' असे परखड मत मांडत काँग्रेसचे खासदार मौलाना असरारुल हक यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
बिहारमधील किशनगंज येथून निवडून आलेले खासदार मौलाना असरारुल हक यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखात दिली आहे. या मुलाखातीमध्ये त्यांनी थेट सोनिया गांधींच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी काँग्रेस नेतृत्वाने जामा मस्जिदच्या शाही इमाम यांची भेट घेतली होती. मात्र हा निर्णय चुकीचा होता. यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेल्याचे मौलाना असरारुल हक यांनी म्हटले आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या लोकांना आवाहन करण्याऐवजी सर्वांना आवाहन करायला पाहिजे होते असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेऐवजी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणे गरजेचे होते. देशातील युवकांनी नरेंद्र मोदींना विकासाच्या मुद्द्यावरच मतदान केले असे हक यांनी आवर्जून सांगितले.
सध्या दिवस बदलले असून तुम्ही काम नाही केले तर तुमचा पराभव अटळ आहे असल्याचे हक यांनी यांनी मुलाखातीमध्ये म्हटले आहे. जम्मू - काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात व देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार नाही असा इशाराही हक यांनी दिला आहे. दरम्यान, मौलाना हक यांच्या या विधानावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'हक यांनी त्यांचे म्हणणे पक्षाच्या बैठकीत मांडणे गरजेचे होते. असे जाहीररित्या मतप्रदर्शन करणे योग्य नाही' असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
मौलाना असरुराल हक हे काँग्रेस नेतृत्वावर टीका करणारे काँग्रेसचे तिसरे नेते आहे. यापूर्वी मिलिंद देवरा, भवरलाल शर्मा यांनीदेखील काँग्रेसवरच टीका केली होती.