Sonam Wangchuk Arrest Updates : सध्या चर्चेत असलेले सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सोनम वांगचुक यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यांनी एनएसए अंतर्गत पतीची अटक नियमबाह्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांची बिनशर्त सुटका करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना लिहिले आहे. त्यांनी या पत्राची प्रत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पाठवली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात गीतांजली यांनी नमूद केले आहे की, आदिवासी म्हणून तुम्ही लडाखच्या लोकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकता. २४ सप्टेंबर रोजी लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराशी सोनम यांचा कसलाही संबंध नव्हता. त्यामुळे त्यांची सुटका करावी.
त्या पुढे लिहितात की, सोनम यांनी स्वतः हिंसाचाराचा निषेध केला होता. सरकारवर कडक कारवाईचा आरोप करत गीतांजली म्हणाल्या की, गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकार लडाख चळवळ कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. गीतांजली यांनी एफसीआरए परवाने रद्द करणे आणि पाकिस्तानी संबंध यासारखे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. सोनम यांच्यावर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तो जोधपूर तुरुंगात आहे. तरी त्यांची बिनशर्त सुटका करावी, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
गीतांजली यांनी असाही दावा केला आहे की, लेहमध्ये माध्यमांशी बोलण्याचा त्यांचा प्रयत्न रोखला जात असल्याने त्यांना देशासमोर त्यांची बाजू मांडण्यासाठी दिल्लीला यावे लागणार आहे. लेहमध्ये कर्फ्यू आहे आणि इंटरनेट बंद आहे. आम्ही काम करू शकत नाही किंवा माध्यमांशी बोलू शकत नाही. माध्यम कर्मचाऱ्यांना आमच्या संस्थेत, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाख (HIAL) देखील प्रवेश दिला जात नाहीये. जेव्हा काही पत्रकार आले, तेव्हा CRPF कर्मचाऱ्यांनी त्यांचा कॅम्पसमध्ये पाठलाग केला. परिस्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे. आम्हाला अद्याप वांगचुक यांच्या अटकेच्या आदेशाची प्रत देण्यात आलेली नाही आणि स्थानिक अधिकारी फोन कॉल्सही उचलत नाहीत. त्यांच्या प्रकृतीबद्दल मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
Web Summary : Gitanjali Angmo, wife of Sonam Wangchuk, urges President Murmu to release her husband, claiming his arrest under NSA is unlawful. She highlights his condemnation of violence and accuses the government of weakening the Ladakh movement. She also claims they are being denied media access.
Web Summary : सोनम वांगचुक की पत्नी गीतांजलि अंग्मो ने राष्ट्रपति मुर्मू से अपने पति को रिहा करने का आग्रह किया, उन्होंने दावा किया कि एनएसए के तहत उनकी गिरफ्तारी गैरकानूनी है। उन्होंने हिंसा की उनकी निंदा पर प्रकाश डाला और सरकार पर लद्दाख आंदोलन को कमजोर करने का आरोप लगाया। उन्होंने यह भी दावा किया कि उन्हें मीडिया से वंचित किया जा रहा है।