जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली तर... अशीच घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील एका व्यक्तीसोबत घडली आहे. येथे एका महिलेच्या बँक खात्यामध्ये अचानक १०० कोटी रुपये जमा झाले. ज्या महिलेच्या खात्यामध्ये ही मोठी रक्कम जमा झाली, त्या महिलेचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. मात्र तिचं बँक खातं बंद करण्यात आलं नव्हतं. जेव्हा या महिलेचा बँक बॅलन्स तिच्या मुलाने तपासला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याने याची माहिती त्वरित बँकेला दिली.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलेच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आली त्या महिलेचं नाव गायत्री देवी आहे. तिचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिच्या बँक खात्यामध्ये १०० कोटी १३ लाख ५६ हजार रुपये एवढी प्रचंड रक्कम जमा झाली होती. या महिलेच्या बँक खात्याशी लिंक असलेला यूपीआय क्रमांक तिचा मुलगा दीपक हा वापरत असे. सोमवारी या खात्यामधून पेमेंट करत असताना पेमेंट न झाल्याने दीपकने बँक बॅलन्स तपासला. तेव्हा बँक खात्यातील रक्कम पाहून तो अवाक् झाला.
त्यानंतर दीपक याने त्वरित बँकेत धाव घेतली. तसेच बँक खात्यातील रकमेची माहिती बँक अधिकाऱ्यांना दिली. जेव्हा अधिकाऱ्यांनी पडताळणी केली तेव्हा दीपकने दिलेली माहिती खरी असल्याचं समोर आलं. त्यानंतर हे बँक खातं तातडीने गोठवण्यात आलं. प्राथमिक तपासामध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.