मुलगा दहशतवादी असल्याने पित्याचा मृतदेह घेण्यास नकार
By Admin | Updated: March 8, 2017 16:11 IST2017-03-08T16:01:41+5:302017-03-08T16:11:10+5:30
आपल्या मुलाला देशद्रोही म्हणत एका देशद्रोह्याचा मृतदेह मी घेणार नाही असं ते बोलले आहेत

मुलगा दहशतवादी असल्याने पित्याचा मृतदेह घेण्यास नकार
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 8 - ठाकूरगंज येथे मगंळवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी सैफुल्लाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. आपल्या मुलाला देशद्रोही म्हणत एका देशद्रोह्याचा मृतदेह मी घेणार नाही असं ते बोलले आहेत. दुसरीकडे सैफुल्लाच्या नातेवाईकांना त्याच्याबद्दल कळल्यानंतर धक्काच बसला आहे. मात्र दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या पित्यांनी आपली मुलं निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
सैफुल्लाचे वडील सरताज यांनी बुधवारी अंतिम संस्कार करण्यासाठी आपल्या मुलाचा मृतदेह घेण्यास नकार दिला. ते बोलले की, 'त्यांने देशविरोधी काम केलं आहे. आम्ही त्याच्यावर नाराज असून अशा देशद्रोह्याचा मृतदेह अजिबात घेणार नाही'. त्यांनी सांगितलं की, 'कौटुंबिक भांडणानंतर सैफुल्ला घरातून निघून गेला होता, आणि त्यानंतर परत आलाच नाही'. सरताज यांनी सांगितलं की, 'काहीच काम करत नसल्याने काही महिन्यांपुर्वी मी त्याला मारलं होतं, त्यानंतर तो घर सोडून पळून गेला होता. गेल्या महिन्यात फोन करुन त्याने आपण सौदीला चाललो असल्याचं सांगितलं होतं'.
सैफुल्ला चकमकीत ठार झाल्यापासून त्याच्या नातेवाईकांना त्याने दहशतवादाचा मार्ग स्विकारला होता यावर विश्वासच बसत नाही आहे. एका नातेवाईकाने सांगितलं की, 'प्रत्येकजण आश्चर्यचकित आहे. दिवसातून पाच वेळा तो नमाज पडत असे. त्याच्याबद्दल असा विचार आम्ही कधीच केला नव्हता'.
तिकडे मध्यप्रदेश आणि कानपूरमधून अटक करण्यात आलेले संशयित दहशतवादी दानिश, इमरान आणि फैजल यांच्या पित्यांनी आपली मुलं निर्दोष असल्याचं सांगत त्यांचा बचाव केला आहे.