Pahalgam terror attack Video : काश्मीर खोऱ्यात पर्यटनासाठी गेलेल्या २६ जणांना घरी परतताच आले नाही. कुटुंबीयांसोबत पर्यटनाचा आनंद घेत असतानाच दहशतवाद्यांनी गाठलं आणि त्यांची हत्या केली. अनेक जण थोडक्यात बचावले. निसर्गाने सौंदर्याने नटलेल्या बैसरन घाटीत ही रक्तरंजित घटना घडली. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांना गाठून मारले, त्याच ठिकाणचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ हल्ला होण्यापूर्वीचा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगाम आणि तिथूनच काही अंतरावर असलेली बैसरन घाटी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली.पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनाच दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि त्यांच्या हत्या केल्या. तब्बल २६ पर्यटक गतप्राण झाले, तर १७ जण गोळी लागून जखमी झाले.
ज्या बैसरन घाटीमध्ये ही घटना घडली आहे. तिथला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भरपूर पर्यटक दिसत आहेत. काही जण आजूबाजूच्या परिसरात फिरत आहेत. काही जण तिथल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर नाश्ता करत आहेत. व्हिडीओमध्ये दूर दूरपर्यंत पर्यटक दिसत आहेत. पाठीमागे पर्वत आणि झाडी दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सर्व काही शांत आणि सुरळीत दिसत आहे. कुठल्याही पर्यटकाच्या मनात आलं नसेल की, इथे २६ लोकांच्या हत्या होणार आहेत. पण, याच ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केल्या.
बैसरन घाटीत सुरक्षा जवान का नव्हते?
पहलगामपासून दूर असलेल्या बैसरन घाटीमध्ये निशस्त्र पर्यटकांच्या हत्या करण्यात आली. मयतांच्या कुटुंबीयांकडून आणि वाचलेल्या पर्यटकांकडून एकही पोलीस किंवा जवान नव्हता, हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. घटना घडलेल्या ठिकाणी लष्कराचे जवान तैनात का नव्हते? याबद्दल सरकारकडून माहिती देण्यात आली.
सरकारने जी सर्व पक्षीय बैठक घेतली. त्यात सांगितलं की, 'दरवर्षी हा मार्ग अमरनाथ यात्रेसाठी जून महिन्यात खुला केला जातो. अमरनाथला जाणारे भाविक पहलगाममध्ये थांबतात, आराम करतात. पण, यावेळी स्थानिक टूर्स ऑपरेटर्संनी सरकारला न सांगताच बुकींग सुरू केली.'
'टूर ऑपरेटर्संनी २० एप्रिलपासूनच पर्यटकांना त्या ठिकाणी नेण्यास सुरूवात केली होती. स्थानिक प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. दरवर्षी जून महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी इथे सुरक्षा जवान तैनात केले जातात', असे उत्तर सरकारकडून देण्यात आले.