देशातील उद्योग धरताहेत सौर ऊर्जेची कास
By Admin | Updated: November 6, 2014 02:46 IST2014-11-06T02:46:27+5:302014-11-06T02:46:27+5:30
आपल्या कारखान्यांच्या किंवा कार्यालयीन इमारतींच्या छतावर सौर पॅनेल्स बसवून त्यातून निर्माण होणारी सौर ऊर्जा स्वत: वापरायची व शिल्लक राहिल्यास ग्रीडला विकून चार पैसेही कमवायचे

देशातील उद्योग धरताहेत सौर ऊर्जेची कास
नवी दिल्ली : राज्य विद्युत मंडळांकडून होणारा बेभरवशाचा वीजपुरवठा व अनियमित पद्धतीने लागू केले जाणारे भारनियमन यातून निदान स्वत:पुरता तरी मार्ग काढण्यासाठी देशातील काही मोठ्या उद्योगांनी आणि संस्थांनी सौर ऊर्जेची कास धरण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या कारखान्यांच्या किंवा कार्यालयीन इमारतींच्या छतावर सौर पॅनेल्स बसवून त्यातून निर्माण होणारी सौर ऊर्जा स्वत: वापरायची व शिल्लक राहिल्यास ग्रीडला विकून चार पैसेही कमवायचे, अशी स्वयंपूर्णतेची योजना आहे. अर्थात असा प्रयोग करणाऱ्यांची संख्या व त्यांच्याकडून निर्माण केल्या जाणाऱ्या सौरऊर्जेचे प्रमाण एकूण देशाचा विचार करता नगण्य असले तरी उद्योगांच्या एकूण अर्थकारणात हा एक अभिनव प्रयोग आहे. विशेषत: सौर पॅनेल्सच्या किमती व ती बसविण्याच्या खर्चात उत्तरोत्तर होत असलेली घट आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांसाठी सरकारकडून देण्यात येत असलेले अनुदान यामुळे अनेक उद्योगांनी या संभाव्य पर्यायाची निदान कागदावर तरी गणिती आकडेमोड करण्यास सुरुवात केली आहे.
विशेषत: विनाखंड व खात्रीलायक वीज पुरवठा ही मूलभूत गरज असलेला माहिती तंत्रज्ञान उद्योग (आयटी) या दिशेने विशेष स्वारस्य दाखवीत असल्याचे संकेत आहेत. व्हॅल्यूलॅब्ज ही आयटी कंपनी या मार्गाने जाणारी नवी पाथस्थ आहे. या कंपनीने त्यांच्या हैदराबाद येथील मुख्यालयाच्या इमारतींवर १३ मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेली सौर पॅनेल्सची यंत्रणा उभारण्याचे काम जुलैमध्ये पूर्ण केले. तेथील प्रकाशाची गरज भागविण्यासाठी आणि तीन हजार कर्मचाऱ्यांचे संगणक चालविण्यासाठी एवढी वीज पुरेशी ठरणार आहे.
एवढेच नव्हे तर सध्या न लागणारी वीज ही कंपनी ग्रीडला पुरवीत आहे. येत्या काही वर्षांत स्वत:ची विजेची सर्व गरज स्वनिर्मित सौरऊर्जेने भागविण्याची कंपनीची योजना आहे. सध्या उभारलेल्या सौरऊर्जा संयंत्रासाठी कंपनीने एक अब्ज रुपये खर्च केला असून, हा खर्च येत्या आठ वर्षांत भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.
इन्फोसिस लि. या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी निर्यातदार कंपनीनेही त्यांच्या बंगळुरू येथील कॅम्पसमध्ये ५० मे.वॉ. क्षमतेचे सौरऊर्जा संयंत्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यातून कंपनीची ३० टक्के विजेची गरज भागू शकेल. सध्या कंपनी प्रति युनिट ६.१५ पैसे या दराने राज्य विद्युत मंडळाकडून वीज घेते. घसाऱ्याचा हिशेब केला तरी सौरऊर्जा तुलनेने स्वस्त पडेल, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)