बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच मतदार याद्यांचं पुनरीक्षण करून त्यामधून अपात्र मतदारांची नावं हटवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मतदारांची नावं मतदार यादीतून हटवल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने शंका उपस्थित करत असलेल्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना यांना प्रतिप्रश्न केला आहे. मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? अशी विचारणा केली आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या पुनरीक्षणाचं काम ९० टक्के पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता बिहारमधील विधानसभेची निवडणूक ही नव्या मतदार यादीनुसारच होणार हे निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाची भूमिका आणि सरकारच्या हेतूंवर टीका केली आहे. तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल गांधीही निवडणूक आयोगवर टीका करत आहेत. तसेच महाराष्ट्र आमि कर्नाटकमधील उदाहरणं देत त्यांनी निवडणूक चोरण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व आरोपांना उत्तरं दिली आहेत.
निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, जर तुम्हाला काही चुकीचं होतं आहे असं वाटंत असेल तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. जर याचिका दाखल करण्यात आली असेल तर निकालही येईल. तोपर्यंत त्याची वाट पाहिली पाहिजे. तसेच कुठली याचिका दाखल झाली नसेल तर अशा प्रकारे आरोप करण्याला अर्थ नाही. अशा प्रकारे निवडणूक आयोगाने या प्रकरणी निर्णय कोर्टावर सोडला आहे.
तेजस्वी यादव निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ५२ ते ५५ लाख मतदार आपल्या पत्त्यावर नसल्याचे म्हटले आहे. काहींना मृत घोषित करण्यात आलेलं आहे. तर काहींनी मतदारसंघ बदलला आहे. त्यामुळे आम्ही या संपूर्ण प्रकियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. दरम्यान, आता मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? अशी विचारणा निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांच्याकडे केली आहे.