देशातील शाळांची सद्यस्थिती काय आहे. याबाबत केंद्र सरकारने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वत:ला हायटेक म्हणवणाऱ्या बहुतांश शाळांचे दावे हे केवळ दिखावा असल्याचे या रिपोर्टमधून उघड झालं आहे. देशात अनेक शाळा अशा आहेत, जिथे कॉम्प्युटर बंद स्थितीत आहेत. त्याशिवाय देशात अर्ध्याहून अधिक अशा शाळा आहेत. जिथे संगणक तर आहेत. पण इंटरनेटची सुविधा नाही आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून शाळांच्या व्यवस्थापनाबाबत जे आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामधील माहिती धक्कादायक आहे. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन प्लस च्या आकडेवारीनुसार देशात केवळ ५७.२ टक्के शाळांमधील कॉम्प्युटर हे चालू स्थितीत आहेत. त्याचप्रमाणे देशातील केवळ ५३.९ टक्के शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे देशातील केवळ ५२.३ टक्के शाळांमध्येच रेलिंग असलेले रॅम्प आहेत.
तसेच शाळांधील प्रवेशांचा विचार करायचा झाल्यास देशातील शाळांमध्ये प्रवेश घेण्याच्या प्रमाणात घसरण झाली आहे. २०२३-२४ मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३७ लाख कमी प्रवेश नोंदवले गेले आहेत. आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५.१७ कोटी होती. तर २०२३-२४ मध्ये हा आकडा २४.८० कोटींवर आला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६ लाखांनी घटली आहे. तर विद्यार्थिनींची संख्या ही २१ लाखांनी घटली आहे.