सर्पमित्राला विषारी कोब्राचा चावा; शरीरात विष उतरताच पडले बेशुद्ध, उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 12:48 IST2021-10-01T12:44:34+5:302021-10-01T12:48:15+5:30
सर्पमित्र संतराम विटाच्या ढिगाऱ्याखालून कोब्रा जातीचा साप पकडत होते.

सर्पमित्राला विषारी कोब्राचा चावा; शरीरात विष उतरताच पडले बेशुद्ध, उपचारादरम्यान मृत्यू
छिंदवाडा- मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये जीव धोक्यात घालून सापाला वाचवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पण, हा त्या सर्प मित्राचा अखेरचा व्हिडिओ आहे. सापाला पकडताना सर्पमित्राला त्या सापाने चावल्याने सर्पमित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी जिल्ह्यातील परसिया ब्लॉकच्या न्यूटन परिसरात ही घटना घडली. संतराम (43) असं या घटनेत मृत्यू झालेल्या सर्पमित्राचं नाव आहे.
संतराम विटाच्या ढिगाऱ्याखालून कोब्रा जातीचा साप पकडत होते. सापाला पकडल्यानंतर संतराम प्लास्टिकच्या बॉक्समध्ये त्या साप भरण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, सापाला डब्यात टाकण्यात संतराम यांना अडचणी येत होती. सापाने त्यांच्या हाताला वेढा घातला होता. यावेळी अचानक सापाने त्यांच्या हातातून निसटून हाताचा चावा घेतला. साप चावल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. यानंतर लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दोन वर्षांपासून साप पकडण्याचे काम करत होते
संतराम गेल्या दोन वर्षांपासून साप पकडण्याचे काम करत होते. साप पकडण्यासोबत उदरनिर्वासाठी ते मजुरी करायचे. जेव्हाही साप पकडण्याचा फोन यायचा, ते लगेच त्या ठिकाणी जायचे. 1 वर्षापूर्वीही एका सापाच्या बचावादरम्यान त्यांना सापाने चावा घेतला होता. मात्र, योग्य वेळी उपचार करुन ते बरे झाले होते. पण, यावेळेस काळाने त्यांच्यावर घाला घातला.