उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील भाजपा कार्यालयात एकच खळबळ उडाली. एका महिलेने एका पदाधिकाऱ्याला चोप दिला. स्वागत समारंभाच्या दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित असलेले कार्यकर्तेही अवाक झाले. बघता बघता कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यालय परिसरात नियुक्त सभासद आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मंचावर नेत्यांचं स्वागत सुरू होतं आणि कार्यकर्ते शुभेच्छा देण्यात मग्न होते. याच दरम्यान एक महिला आपल्या मुलासह कार्यक्रमस्थळी पोहोचली आणि थेट एका पदाधिकाऱ्याच्या दिशेने गेली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने कोणताही विचार न करता त्या पदाधिकाऱ्याची कॉलर पकडली आणि त्याच्यावर पैसे हडपल्याचा आरोप करू लागली. लोक काही समजून घेण्याच्या आतच महिलेने त्याच्या कानशिलात लगावली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित लोकांना धक्का बसला आहे.
हा संपूर्ण प्रकार पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित व्यक्तीला एलआयसी (LIC) पॉलिसीच्या नावाखाली सुमारे साडेचार लाख रुपये दिले होते, मात्र ती रक्कम जमा करण्यात आली नाही, असा महिलेचा आरोप आहे. महिला बऱ्याच काळापासून आपले पैसे परत मागत होती, पण त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. याच रागातून महिला थेट कार्यक्रमात पोहोचली आणि तिने आपला संताप व्यक्त केला. कानाखाली मारल्यानंतर महिलेने पदाधिकाऱ्याची कॉलर धरून त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली.
याच दरम्यान महिलेचा राग इतका अनावर झाला की तिने चप्पल काढली आणि मारण्यासाठी पुढे सरसावली. हे पाहून तेथे उपस्थित लोकांनी तत्काळ मध्यस्थी करण्यासाठी धाव घेतली. काही वेळ तिथे शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचं वातावरण होतं. महिला आणि तिचा मुलगा दोघेही पैसे परत मिळण्याच्या मागणीवर ठाम होते. कार्यकर्त्यांनी कसंबसं परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच वेळ तणाव कायम होता.
गोंधळाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना वेगळं केलं आणि महिलेला कार्यालय परिसराबाहेर नेलं. त्यानंतरच कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकला. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही बाजूंची चौकशी केली जात आहे. तपासात जे तथ्य समोर येईल, त्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यात महिला संतापून पदाधिकाऱ्याशी भिडताना आणि लोक तिला रोखताना स्पष्ट दिसत आहेत. या प्रकारामुळे परिसरात चर्चा रंगली आहे.
Web Summary : A woman disrupted a BJP event in Maharajganj, Uttar Pradesh, assaulting a party official over alleged misappropriated LIC funds. The incident caused chaos and police intervention.
Web Summary : उत्तर प्रदेश के महाराजगंज में भाजपा कार्यक्रम में एक महिला ने कथित तौर पर एलआईसी फंड के गबन को लेकर एक पार्टी अधिकारी पर हमला किया। घटना से अराजकता फैल गई और पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा।