अकोल्यात ट्रकने सहा जणांना चिरडले, मृतांमध्ये लहान बाळाचा समावेश
By Admin | Updated: August 12, 2014 16:56 IST2014-08-12T12:00:11+5:302014-08-12T16:56:50+5:30
अकोला येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्ता ओलांडणा-या पाच महिला शेत मजूरांसह एका लहान बाळाला चिरडल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली.

अकोल्यात ट्रकने सहा जणांना चिरडले, मृतांमध्ये लहान बाळाचा समावेश
ऑनलाइन टीम
अकोला, दि. १२ - अकोला येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्ता ओलांडणा-या पाच महिला शेत मजूरांना चिरडल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात पाचही महिला व त्यांच्यासोबत असलेल्या लहान बाळाचा मृत्यू झाला असून घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अकोलापासून २५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर कोळंबी गाव आहे. या गावातील पाच महिला मजूर सकाळी साडे नऊच्या शेतीवर काम कऱण्यासाठी निघाल्या होत्या. महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या घटनेनंतर ट्रकचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी पाठलाग करुन त्याला थांबवले. संतप्त ग्रामस्थांनी ट्रकला पेटवून दिले तसेच ट्रकचालकाला मारहाण करुन पोलिसांच्या हवाली केले. याघटनेमुळे कोळंबी गावात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सध्या बंद केली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.