दोन पाकिस्तान्यांसह 6 अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 05:58 IST2021-12-31T05:57:51+5:302021-12-31T05:58:22+5:30
Jammu Kashmir : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम व अनंतनागच्या विशिष्ट भागांत काही दहशतवादी लपले आहेत आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती पोलीस व सुरक्षा दलांना मिळाली होती.

दोन पाकिस्तान्यांसह 6 अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
- सुरेश डुग्गर
जम्मू : काश्मीर खोऱ्यातील कुलगाम व अनंतनाग जिल्ह्यांत एकाच वेळी कारवाई करून सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांना एकाच वेळी कंठस्नान घातले आहे. या सहापैकी दोन दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते, हे उघड झाले आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम व अनंतनागच्या विशिष्ट भागांत काही दहशतवादी लपले आहेत आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती पोलीस व सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी हे दहशतवादी लपलेल्या भागाला घेरून ठेवले होते. तसेच स्थानिकांना घरांतून बाहेर पडण्यास मज्जाव केला होता. अतिरेक्यांचा प्रत्यक्ष शोध सुरू होताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
पोलीस महानिरीक्षक म्हणाले...
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले की, हे सहाहीजण जैश ए महंमद या संघटनेचे होते. या सहापैकी चारजणांची ओळख पटली असून, त्यांतील दोघे पाकिस्तानी आहेत, तर दोघेजण स्थानिक रहिवासी आहेत. अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे व स्फोटके होती.