मंत्र्याला सहा कोटींची लाच!
By Admin | Updated: July 19, 2015 04:26 IST2015-07-19T04:26:34+5:302015-07-19T04:26:34+5:30
केंद्र सरकार आणि जपान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून गोव्यात २००३पासून राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण विषयक ‘जैका प्रकल्पा’चे काम

मंत्र्याला सहा कोटींची लाच!
वॉशिंग्टन/पणजी : केंद्र सरकार आणि जपान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून गोव्यात २००३पासून राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण विषयक ‘जैका प्रकल्पा’चे काम मिळविण्यासाठी गोव्यातील त्या वेळच्या एका मंत्र्यासह सरकारी अधिकाऱ्यांना ६ कोटी रुपयांची (९.७६ लाख डॉलर) लाच दिल्याची कबुली अमेरिकेतील लुईस बर्जर या कंपनीने तेथील एका खटल्यात दिली आहे. एवढेच नव्हेतर, १७.१ दशलक्ष डॉलरचा दंड भरून हे प्रकरण मिटविण्याची तयारीही कंपनीने दर्शविली आहे.
या वृत्ताने गोव्यात दिवसभर खळबळ उडाली व यात संबंधित मंत्री म्हणून चर्चिल आलेमाव यांच्या नावाची शक्यता वर्तविली गेल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने वॉशिंग्टनहून दिलेल्या वृत्तात लाच दिलेल्या या मंत्र्याच्या नावाचा उल्लेख नाही. तसेच हे कंत्राट कोणत्या काळातील आहे याचाही उल्लेख नाही. परंतु ‘जैका प्रकल्पा’च्या कामांचा संगतवार आढावा घेतल्यास हे कंत्राट सन २०१०मधील असल्याचे स्पष्ट होते.
त्या वेळी गोव्यात काँग्रेसचे सरकार होते व चर्चिल आलेमाव सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. आलेमाव भ्रष्टाचाराबाबत नेहमीच वादग्रस्त ठरल्याने शनिवारीही गोव्यात सर्वत्र आलेमाव यांचेच नाव चर्चेत राहिले. आलेमाव यांच्या विरोधात यापूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे अन्य एका प्रकरणी एफआयआरही नोंद आहे. २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आलेमाव पराभूत झाले.
लुईस बर्जर कंपनीचे दोन अधिकारी रिचर्ड हर्ष (वय ६१, राहणारे फिलिपाईन्स) आणि जेम्स मॅकलंग (वय ५९, राहणारे संयुक्त अरब अमिराती) या दोन्ही अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप आहे.
भारत व व्हिएतनाममधील जैकाच्या प्रकल्पांची कामे पाहण्यासाठी मॅकलंग यांनी यापूर्वी ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे. जैकाविषयक सरकारी कामांच्या व्यवस्थापनाची कंत्राटे मिळविण्यासाठी लुईस बर्जर कंपनीने भारत, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि कुवेतमधील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप सिद्ध झाल्याने शनिवारी लुईस बर्जर ही कंपनी १७.१ दशलक्ष डॉलर गुन्हेगारी स्वरूपाचा दंड भरण्यास तयार झाली आहे, असे वॉशिंग्टनहून आलेल्या वृत्तात म्हटले आहे.
लुईस बर्जरसह एकूण चार सल्लागार कंपन्यांनी संयुक्तपणे जैका प्रकल्पासाठी काम केले होते. या चारही सल्लागार कंपन्यांनी मिळून जैका प्रकल्प व्यवस्थापन माहिती व्यवस्था निर्माण केली.
निविदांचे मूल्यांकन करणे, बांधकाम योजना व डिझाईनचा आढावा घेणे आणि कामे ठरलेल्या वेळेत व ठराविक बजेटच्या मर्यादेत पूर्ण करणे याची काळजी घेण्याचे काम लुईस बर्जर व जपानमधील काही कंपन्या मिळून करत होत्या. (विशेष प्रतिनिधी)
लाचेची डायरीत नोंद!
भारतीय अधिकाऱ्यांना दिलेल्या लाचेबाबतची सविस्तर माहिती व लेखा अहवाल असलेली डायरी लुईस बर्जर कंपनीने ठेवली होती. अमेरिकेच्या सरकारी प्रॉसिक्युटर्सनी तयार केलेल्या अकरा पानी आरोपपत्रात तसा उल्लेख आहे.
गोव्यातील प्रकल्पांबाबत मंत्री व अधिकाऱ्यांना लाच कशी दिली, याचा उल्लेख २६ आॅगस्ट २०१० रोजी पेमेंट ट्रॅकिंग शेड्यूलमध्ये केला आहे. गोव्यातील मंत्र्याला लुईस बर्जरच्या एजंटने लाच दिली. कोन्सोर्टियमच्या भागीदाराने १७ आॅगस्ट २०१० रोजी लुईस बर्जरचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जेम्स मॅकलंग यांना एक मेल संदेश पाठवला, त्यातही लाचप्रकरणी उल्लेख आहे.
कंपनीकडून लाचेचा उल्लेख हा कमिटमेंट शुल्क, मार्र्केटिंग शुल्क, फिल्ड आॅपरेशन्स खर्च, अशा सांकेतिक शब्दांद्वारे केला जातो. लुईस बर्जरने आपल्या एजंटांशी व कर्मचाऱ्यांशी लेखी संवाद साधताना तशा सांकेतिक भाषेचा उल्लेख केला आहे. त्यासाठी रोख रक्कम वितरण अर्ज व इनवॉयसिस वापरण्यात आले.
- कोन्सोर्टियमच्या अन्य भागीदारांसोबत लुईस बर्जर कंपनीने गोवा व गुवाहाटीमध्ये पाणीपुरवठाविषयक दोन मोठ्या कामांची कंत्राटे मिळविली. कंपनीने कर्मचारी, एजंट आणि कोन्सोर्टियमच्या अन्य भागीदारांमार्फत लाचेच्या स्वरूपाची माहिती व्यवस्थित ठेवली, असे न्यायालयीन कागदपत्रांत स्पष्ट केले आहे. कर्मचारी व एजंटांमध्ये वितरित केलेल्या स्प्रेडशीटमध्ये कंपनीने लाचेचा उल्लेख केला आहे.
लुईस बर्जर कंपनीचे अधिकारी गोव्यात येत होते. मात्र, आमचा त्यांच्याशी जास्त संपर्क येत नव्हता. त्यांच्यापेक्षा जपानच्या कंपन्यांचे अधिकारी जास्त प्रमाणात गोव्यात यायचे. चार कंपन्यांचे कोन्सोर्टियम होते. अमेरिकेत चर्चेस आलेले लाच प्रकरण काय, ते आम्हाला ठाऊक नाही. गोव्यात आतापर्यंत जैका प्रकल्पांतर्गत साडेपाचशे कोटींची कामे झाली. साळावली येथे सर्वात मोठा जल प्रकल्प उभा राहिला. अजून सुमारे दोनशे कोटींची कामे सुरू आहेत. जैका प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची कामे गोव्याला मंजूर झाली आहेत; पण त्यात आर्थिक भाग नाही. त्यात तांत्रिक सहकार्याचा भाग आहे.
- ए. वाचासुंदर, जैका प्रकल्प विभाग प्रमुख
मला लाच दिली, असे कोणीही कोठेही म्हटलेले नाही. माझे नाव कोणीही घेतलेले नाही. जर कोठे कोणते डिल झालेले असेल तर मला त्याची कोणतीही कल्पना नाही.
- चर्चिल आलेमाव, माजी बांधकाममंत्री, गोवा