नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कधीही बिघडू शकते- लष्कर प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 20:40 IST2019-12-18T20:19:31+5:302019-12-18T20:40:37+5:30
पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात वाढ

नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कधीही बिघडू शकते- लष्कर प्रमुख
नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कधीही बिघडू शकते. त्यासाठी देशानं सज्ज राहायला हवं, असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनांचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांनी हे भाष्य केलं आहे.
मोदी सरकारनं ५ ऑगस्टला जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. त्यामुळेच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडू शकते असं म्हटल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मोदी सरकारनं नागरिकत्व कायद्यात केलेल्या बदलांमुळे दोन अण्वस्त्र देशांमध्ये युद्ध होऊ शकतं, असा इशारा खान यांनी कालच दिला आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डींनी नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची आकडेवारी दिली होती. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तानी सैन्याकडून ९५० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचं रेड्डींनी सभागृहाला सांगितलं. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे.