Puneet Khurana News: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणासारखीच घटना उत्तर दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील मॉडेल टाऊन बेकरीचे मालक पुनीत खुराणा यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि त्याच्या सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप पुनीत खुराणांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या बहिणीने याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे.
पुनीत खुराणा यांचे मनिका पाहवा यांच्यासोबत लग्न झाले होते. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मनिका पाहवा वेगळी राहत होती. ती बेकरीमध्ये हिस्सा मागत होती. त्यामुळेच त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले.
पुनीत खुराणा यांच्या बहिणीने एएनआयशी बोलताना सांगितले की, "मनिका पाहवाचे आई-वडील आणि तिची बहीण माझा भाऊ पुनीतवर दबाव टाकत होते. मनिका पाहवा म्हणाली होती की, तू काहीच करू शकत नाही, हिमंत असेल, तर तू आत्महत्या कर. त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले."
"मनिका आणि तिचे कुटुंबीयांनी माझ्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढण्याची धमकी दिली होती. पुनीतला पुन्हा दुकान सुरू करून दाखव अशी धमकीही दिली होती. ते शिवीगाळ करत होते आणि त्याच्यावर दबाब टाकत होते", पुनीत खुराणा यांच्या बहिणीने म्हटले आहे.
पुनीतकडे मागत होती हिस्सा
बहिणीने आरोप केला की, "पूर्वी ते पार्टनरशिपमध्ये बेकरी चालवत होते. पण, घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वहिनी कॉल करून वाटा मागत होती. ती म्हणत होती की, तिचा हिस्सा सोडणार नाही."
"मनिका पुनीतचे इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होती. त्यावरून ती लोकांशी वाईट वर्तणूक करत होती. त्यामुळे माझ्या भावाने सकाळी ३ वाजता कॉल केला. दोघांमध्ये बेकरी व्यवसायावरून वाद झाले होते", असे पुनीत खुराणाची बहीण म्हणाली.
पुनीत खुराणा आणि मनिका पाहवा यांचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. दोन वर्षांपूर्वी ते वेगवेगळे राहायला लागले. त्यानंतर आता त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली होती.