बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणास सुरुवात केल्याने मोठा वाद उद्भवला होता. तसेच त्यावरून कोर्टकचेऱ्याही झाल्या होत्या. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला असून, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात लागू करण्याचे निश्चित केले आहे. या संदर्भात १० सप्टेंबर रोजी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. एसआयआरमध्ये भारतीय नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची मागणीही निवडणूक आयोगाने केली आहे.
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदारासंची सध्याची संख्या, मागच्या एसआयआरची तारीख आणि डेटा, डिजिटायझेशनची स्थिती यासह एकूण १० मुद्यांवर माहिती मागवण्यात आली आहे. मतदान केंद्रांचं युक्तिकरण आणि एकूण केंद्रांच्या संख्येबाबतही अहवाल द्यावा लागणार आहे. अधिकारी आणि बीएलओंची नियुक्ती आणि प्रशिक्षणाच्या स्थितीवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. सध्या बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची मोहीम सुरू असून, ती ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
दरम्यान, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात लागू करण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या संकेतांनुसार मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात एकाच वेळी लागू होणार आहे. एसआयआरच्या तारखेबाबत अंतिम निर्णय हा नंतर घेतला जाणार आहे.