ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 07:43 IST2025-12-17T07:43:05+5:302025-12-17T07:43:50+5:30
ज्याठिकाणी उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा येथील मूळ रहिवाशांची संख्या जास्त आहे. आता मसुदा यादी तयार झाल्यानंतर दावे प्रतिदावे, आक्षेप यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या मसुदा मतदार यादीतून जवळपास ४५ हजार नावे हटवण्यात आली आहेत. त्यानंतर भवानीपूर येथे स्थानिक नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीतून आता बूथ पातळीवरील बीएलएला निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ज्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत त्या सर्व मतदारांच्या घरोघरी जात पडताळणी करावी. विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत (SIR) सुमारे ४४,७८७ मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत, जी एकूण मतदारांच्या सुमारे २१.७ टक्के आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत भवानीपूर येथे एकूण २ लाख ६ हजार २९५ इतके मतदार होते. मात्र एसआयआरनंतर केवळ १ लाख ६१ हजार ५०९ मतदारांची नावे ठेवली आहेत. ज्यातून ४४ हजार ७८७ मतदार म्हणजे २१ टक्के मतदार यादीतून हटवण्यात आले आहेत. यावर तृणमूल काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत मोठ्या संख्येने मतदारांना मृत, स्थलांतरित असल्याचं दाखवत यादीतून वगळल्याचा आरोप केला आहे. कुठल्याही वैध मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येऊ नये. जी नावे वगळली त्याची पडताळणी झाली पाहिजे असं टीएमसी नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.
'या' परिसरावर नजर
भवानीपूर मतदारसंघात कोलकाता महापालिकेचे ६३, ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७७ आणि ८२ वार्डाचा समावेश आहे. वार्ड ७०, ७२ आणि ७७ यातून मोठ्या संख्येने मतदार वगळले आहेत. ज्यात अल्पसंख्याक बहुल भाग वार्ड क्रमांक ७७ च्या तपासात विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले होते. भवानीपूर मतदारसंघ दाट लोकसंख्येचा आहे. ज्याठिकाणी उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा येथील मूळ रहिवाशांची संख्या जास्त आहे. आता मसुदा यादी तयार झाल्यानंतर दावे प्रतिदावे, आक्षेप यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पडताळणीवेळी पीडित मतदारांच्या सोबत उभे राहा असं टीएमसी नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
टीएमसी सुरू करणार मोहीम
दरम्यान, स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी घेत टीएमसीने मे आय हेल्प यू नावाने प्रत्येक वार्डात कॅम्पेन सुरू केले आहे. जेणेकरून लोकांना कागदपत्रे, फॉर्म भरणे आणि सुनावणीसाठी मदत मिळू शकेल. आवश्यकता भासल्यास कार्यकर्ते घरोघरी जात मतदारांची मदत करतील. पश्चिम बंगालमध्ये भवानीपूर, कोलकाता पोर्ट, बालिगंज आणि राशबिहारी या मतदारसंघात एकूण २ लाख १६ हजाराहून अधिक मतदार हटवण्यात आले आहेत. एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी याठिकाणी जवळपास ९.०७ लाख मतदार होते.