SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:23 IST2025-12-19T19:23:19+5:302025-12-19T19:23:49+5:30
SIR in Tamil Nadu: सध्या देशातील काही राज्यांत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान, तामिळनाडूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
सध्या देशातील काही राज्यांत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान, तामिळनाडूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयआरनंतर तयार करण्यात आलेल्या तामिळनाडूमधील मतदार यादीच्या मसुद्यामधून तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ नावं हटववण्यात आली आहेत. तर नव्या मतदार यादीच्या मसुद्यामध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश आहे.
तामिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या राज्यातील मतदार याद्यांच्या मसुदा यादीमध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ६६ हजार महिला आणि २ कोटी ७७ लाख पुरुषांचा समावेश आहे. एसआयआर पूर्वी तामिळनाडूमध्ये सुमारे ६ कोटी ४१ लाख नोंदणीकृत मतदार होते. तसेच या प्रक्रियेनंतर त्यापैकी तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ मतदारांची नावं हटववण्यात आली आहेत.
हटववण्यात आलेल्या मतदारांमध्ये तब्बल २६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश आहे. तर ६६ लाख ४४ हजार मतदार असे आहेत जे कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेले आहेत. त्याशिवाय ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारांची नावंही यादीतून हटवण्यात आली आहेत. या मतदारांची नावं एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंवललेली दिसून आली, अशी माहिती अर्चना पटनायक यांनी दिली.
अर्चना पटनायक यांनी सांगितले की, ज्या मतदारांना स्थलांतरीत म्हणून चिन्हांकित करण्यात आलं होतं. त्यामधीली ६६ लाख ४४ हजार ८८१ मतदार संपूर्ण राज्यात घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या पडताळणीच्या तीन टप्प्यांनंतरही आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आले नाहीत.
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही तामिळनाडूमध्ये एसआरआयची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने एसआयआरविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकादेखील दाखल केली होती. आता एसआयआरवर टीका करताना स्टॅलिन यांनी त्याचा लोकशाहीविरोधी पाऊल असा उल्लेख केला आहे. तसेच निवडणुकीच्या काही महिने आधी मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याचा निर्णय हा मतदारांना हटवण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट आहे, असा आरोपही स्टॅलिन यांनी केला.