नवी दिल्ली: कोळसा खाणपट्टा वाटप घोटाळ्यात सीबीआय विशेष न्यायालयाने आरोपी करून समन्स बजावल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘अखेर सत्य बाहेर येईल व माझे निरपराधित्व सिद्द होईल’, असा विश्वास व्यक्त केला तर काँग्रेसनेही सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले.सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल वृत्तवाहिनीस प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘ मनमोहन सिंग काही गैर किंवा भ्रष्ट कृती करतील यावर भारतात कोणीही विश्वास ठेवेल, असे मला वाटत नाही. ते नेहमीच सावध असायचे व कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची ते काळजी घ्यायचे. आम्ही (काँग्रेस) सर्व शक्तीनिशी त्यांचा बचाव करू. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनीही हिच भावना व्यक्त करताना म्हटले की, डॉ. मनमोहन सिंग हे कमालीची सचोटी आणि नितीमत्ता असलेली व्यक्ती आहेत.पक्षाचे आणखी एक प्रवक्ते संजय झा यांनी टिष्ट्वटरवर अशी प्रतिकिया टाकली,‘ (सत्ताधाऱ्यांच्या ) आनंदात मिठाचा खडा टाकतो आहे याबद्दल क्षमस्व, पण न्यायालयाने समन्स काढले म्हणून कोेणी दोषी ठरत नाही. कायद्याचे हे अगदी प्राथमिक तत्व आहे. बरोबर की नाही? संजय झा यांनी असेही म्हटले की, त्यांनी (डॉ. मनमोहन सिंग) पारदर्शकतेचा आग्रह धरला, पण भाजपाशासित राज्यांनीच त्याला विरोध केला होता. वस्तुस्थिती अशी आहे की, त्या काळात जे काही वादग्रस्त कोळसा खाणपट्टे वाटप झाले ते सर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल इत्यादी काँग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यांतच झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सिंग असे काही करतील हे अविश्वसनीय
By admin | Updated: March 11, 2015 23:56 IST