सिंग, भागवत बनले विरोधकांचे लक्ष्य
By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:42+5:302015-12-05T09:10:42+5:30
काही विरोधी पक्षांनी ‘कुत्रा’ टिप्पणीवरून परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढविल्यामुळे तर अन्य काही पक्षांनी रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या

सिंग, भागवत बनले विरोधकांचे लक्ष्य
नवी दिल्ली : काही विरोधी पक्षांनी ‘कुत्रा’ टिप्पणीवरून परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढविल्यामुळे तर अन्य काही पक्षांनी रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या राम मंदिरावरील वक्तव्यावरून गोंधळ घातल्यामुळे शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज ठप्प पडले.
हरियाणाच्या फरिदाबाद येथे दोन दलित बालकांच्या हत्येनंतर त्यांची ‘कुत्र्या’शी तुलना केल्याबद्दल व्ही. के. सिंग यांना मंत्रिमंडळातून आणि सभागृहातूनही बडतर्फ करण्याची जोरदार मागणी करीत काँग्रेस आणि बसपा सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. त्यामुळे शुक्रवारी कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
काँग्रेस व बसपाच्या या गोंधळात समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी भर घातली.
माझ्या हयातीतच राम मंदिर बांधण्यात येईल आणि मंदिर बांधण्यासाठी वातावरण तयार केले पाहिजे, असे वक्तव्य भागवत यांनी केले होते. त्याचा निषेध करीत सपा सदस्यांनी कामकाज बंद पाडले. भागवत यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सपा सदस्यांनी केली. भागवत यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे, असे सांगत सरकारने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला.
लोकांना राम मंदिर बांधण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. परंतु सरकार न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करेल, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
व्ही.के. सिंग फोडताहेत मीडियावर खापर
हरियाणातील फरिदाबादमधे दोन दलित मुलांच्या हत्येनंतर कुत्र्याला दगड मारण्याचे उदाहरण देण्याच्या संदर्भात, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंगांनी टिष्ट्वटरवर आता सारा दोष मीडियाच्या माथी मारला आहे.
कोणत्याही पत्रकाराचे नाव न घेता सिंग म्हणतात, केवळ मला बदनाम करण्याच्या हेतूने वाहिनीवर बातमी देणाऱ्या न्यूजकास्टरने सतत चुकीच्या पद्धतीने बातमी दाखवली. प्रत्येक गोष्टीबाबत केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही.