बेळगावचे नाटय़ संमेलन रद्द होण्याची चिन्हे
By Admin | Updated: December 12, 2014 02:52 IST2014-12-12T02:52:14+5:302014-12-12T02:52:14+5:30
मोहन जोशी यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखाविल्याबद्दल माफी मागावी, असे ठराव एकमताने मंजूर केले आहेत. यामुळे बेळगावचे नाटय़संमेलन रद्द होण्याची चिन्हे आहेत.

बेळगावचे नाटय़ संमेलन रद्द होण्याची चिन्हे
मराठी भाषिक संतप्त : सीमाप्रश्नावरून मोहन जोशींच्या माफीची मागणी
बेळगाव : ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी सीमाप्रश्नासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेने बेळगावात आगामी नाटय़संमेलन घेणो शक्य नाही आणि मोहन जोशी यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखाविल्याबद्दल माफी मागावी, असे ठराव एकमताने मंजूर केले आहेत. यामुळे बेळगावचे नाटय़संमेलन रद्द होण्याची चिन्हे आहेत.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे बुधवारी मोहन जोशी यांचा वार्तालापचा कार्यक्रम आयोजित केला होता. सीमाप्रश्न हा तुमचा आहे, तो तुम्हीच सोडवायचा. सीमाप्रश्न सोडविणो हे माङो काम नाही. राजकीय व्यक्ती आपल्या व्यासपीठावरून नाटय़ संमेलनाबाबत बोलतात का? असे वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले. त्यामुळे सीमावासीय मराठी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. परिणामी बेळगाव शाखेच्या कार्यकारिणीने गुरुवारी तातडीची बैठक घेतली आणि मोहन जोशी यांनी सीमाप्रश्नाबाबत केलेल्या वक्तव्याशी बेळगाव शाखा सहमत नाही; मराठी भाषिकांच्या भावना दुखाविल्याबद्दल मराठी भाषिकांची मोहन जोशी यांनी माफी मागावी आणि आगामी नाटय़ संमेलन बेळगावमध्ये घेणो शक्य नाही, असे तीन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले, अशी माहिती शाखेच्या सचिव नीना जठार यांनी पत्रकारांना दिली.
नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेच्या ठरावांच्या पाश्र्वभूमीवर मोहन जोशी यांनी सीमाप्रश्नाबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. माङया बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे म्हणत मोहन जोशींनी दिलगिरी व्यक्त केली.