सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील सुत्रधाराला भारतात आणणार; विशेष पथक रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 09:14 PM2023-07-30T21:14:47+5:302023-07-30T21:15:34+5:30
Sidhu Moosewala Murder: सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड सचिन बिश्नोईला भारतात आणण्याची तयारी झाली आहे.
Sidhu Moosewala Murder Case: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातील सुत्रधार गँगस्टर सचिन बिश्नोई याला अटक करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे एक पथक अझरबैजानला पाठवण्यात आले आहे. सचिन बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा पुतण्या आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तो फरार झाला होता. सचिन बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून गेला होता.
दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आज रात्रीपर्यंत अझरबैजानमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. सचिन बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण करण्याचे काम सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) आणि काउंटर इंटेलिजन्स युनिटच्या दोन निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाला सोपवण्यात आले आहे.
सचिन बिश्नोई हा सिद्धू मूसवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड मानला जातो. त्याच्या अटकेने आणि प्रत्यार्पणाने मूसेवाला खून प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होतील. काही दिवसांपूर्वी सचिन बिश्नोई याला अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. आता भारतीय सुरक्षा यंत्रणा तिथे गेल्याने त्याला भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग येईल.
सिद्धू मुसेवालाची गेल्या वर्षी हत्या झाली
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने एका फेसबुक पोस्टमध्ये खुनाची जबाबदारी घेतली होती. या प्रकरणाबाबत लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून मीडियाला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले होते की, त्याच्या टोळीने त्याच्या एका साथीदाराच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुसेवालाची हत्या केली होती.