मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील शिक्षण विभागात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलांना शिकवण्याऐवजी सिधी येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत वर्गातच झोपले. मुलं जमिनीवर बसून अभ्यास करताना दिसत होती. सिधी जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये ही बाब उघडकीस आल्याने शिक्षण विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक या घटनेवर संताप व्यक्त करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकांनी विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात असल्याचं म्हटलं आहे. शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी असेच बेफिकीर राहिले तर विद्यार्थ्यांचं काय होणार? अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवणं हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही धोकादायक आहे. दारूच्या नशेत शिक्षकाने मुलांना शिकवणं ही गंभीर बाब आहे.
शाळेत पोहोचलेल्या एका पालकाने शिक्षकाची ही कृती मोबाईलमध्ये टिपली असता ही भयंकर बाब उघडकीस आली. त्यानंतर याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या घटनेने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शाळांमध्ये दारू पिऊन वर्गात झोपलेल्या शिक्षकांची ही पहिलीच घटना नाही.
रेवा येथील एका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकही दारूच्या नशेत झोपलेले दिसले होते. तसे दारूच्या नशेत असलेल्या एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या बॅगचा उशी म्हणून वापर केला आणि झोपले. ही बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.