भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ठरले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवताच शुंभाशू शुक्ला यांनी भारतीयांशी संवाद साधला. भारतासाठी हा एक मोठा क्षण आणि अंतराळातील देशाच्या भविष्याकडे एक अभिमानास्पद पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. शुंभाशू शुक्ला यांचा भारतीयांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहचल्यानंतर शुभांशू शुक्ला म्हणाले की, "तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मी इथे सुखरुप पोहोचलो आहे. इथे उभे राहणे सोपे वाटत असले तरी तसे कठीण आहे. येत्या काही दिवसात इथल्या वातावरणाची आम्हाला सवय होईल. पुढील १४ दिवस आम्ही इथे अनेक संशोधन करणार आहोत. काही वेळापूर्वी ड्रॅगनमध्ये असताना मी तुम्हा सर्वांशी संवाद साधला. यापुढे मी रोज आपल्याशी बोलत राहील. जय हिंद, जय भारत."
शुभांशू शुक्ला पुढे म्हणाले की, "मी अंतराळात येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करताच येथील क्रूने आमचे उस्फुर्त असे स्वागत केले. कुणीतरी आपल्यासाठी घराचे दरवाजे उघडत आहे, असा भास आम्हाला झाला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. इथे येण्यापूर्वी ज्या काही माझ्या अपेक्षा होत्या, त्या आताच पूर्ण झाल्यासारख्या वाटत आहेत."
गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीरित्या जोडले गेले, असे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने आपल्या निवेदनात म्हटले. "शुभांशू शुक्ला यांचे वडील शंभू दयाल शुक्ला यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, शुभांशूची मोहीम यशस्वी होत आहे. याचा मला आनंद आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आमचा गौरव केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे", असेही ते म्हणाले.