मुलांनी ८० कोटींची प्रॉपर्टी बळकावली; वडिलांचा वृद्धाश्रमात मृत्यू, अंत्यसंस्कारास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:07 IST2025-01-02T12:06:59+5:302025-01-02T12:07:48+5:30
एक मुलगा बिझनेसमन आहे आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून कोट्यवधींची संपत्ती हिसकावून घेतली आणि ते आजारी पडल्यावर त्यांना असंच रस्त्यावर सोडल्याचं म्हटलं जात आहे.

फोटो - ndtv.in
वाराणसीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांनी वृद्धाश्रमामध्ये अखेरचा श्वास घेतला. खंडेलवाल यांचे कुटुंबीयही आहेत पण त्यांच्या शेवटच्या क्षणी कोणीही आलं नाही, मुलगा बिझनेसमन आणि मुलगी वकील आहे. कोट्यवधींची पॉपर्टी असून देखील श्रीनाथ खंडेलवाल यांनी वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी शेकडो पुस्तकं लिहिली आहेत.
श्रीनाथ खंडेलवाल यांचं मोठं कुटुंब आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांचा एक मुलगा बिझनेसमन आहे आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून कोट्यवधींची संपत्ती हिसकावून घेतली आणि ते आजारी पडल्यावर त्यांना असंच रस्त्यावर सोडल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमन पुढे आले आणि त्यांनी त्यांना काशी कुष्ठरोग वृद्धाश्रमात ठेवलं.
वृद्धाश्रमात ते सुमारे दहा महिने राहिले आणि तेथे त्यांना मोफत सेवा देण्यात आली पण एकदाही कुटुंबातील कोणीही आलं नाही. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली नाही. कोट्यवधींचे मालक आणि २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अध्यात्मिक साहित्यकाराच्या मृत्यूनंतरही नातेवाईक आले नाही. त्यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी समाजसेवक अमन यांनी देणगी गोळा करून अंत्यसंस्कार केले.
वाराणसीस्थित साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांचं शनिवारी निधन झालं. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीनाथ खंडेलवाल यांनी सुमारे ४०० पुस्तकं लिहिली आणि अनुवादित केली आणि ८० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक होते. सारनाथ येथील काशीकुष्ट सेवा संघ वृद्धाश्रमात बराच काळ वास्तव्य करत होते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची मुलं अंत्यदर्शनासाठी आली नाहीत. एनडीटीव्ही हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.