धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:08 IST2025-07-31T08:08:31+5:302025-07-31T08:08:51+5:30
test tube baby fake centre raid : लाखो रुपये खर्च करून जर तुम्ही जन्म दिलेलं मूल तुमचं नाही, असं तुम्हाला कळलं तर? असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले!
test tube baby fake centre raid : आपल्याला स्वतःचं मूल व्हावं, यासाठी काही जोडपी खूप प्रयत्न करत असतात. काही अडथळे आल्यास यासाठी अनेक औषधोपचार देखील केले जातात. तर, कधीकधी आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी या प्रक्रियांची देखील मदत घेतली जाते. यासाठी अमाप पैसा खर्च केला जातो. पण, लाखो रुपये खर्च करून जर तुम्ही जन्म दिलेलं मूल तुमचं नाही, असं तुम्हाला कळलं तर? असाच काहीसा प्रकार हैदराबादमधून समोर आला आहे. यातूनच एका बनावट टेस्ट ट्यूब सेंटर आणि त्यात सुरू असलेल्या काळ्या कारनाम्यांचे पितळ उघडे पडले आहे.
हैदराबाद पोलिसांनी एका बनावट टेस्ट ट्यूब सेंटरवर कारवाई करत मुख्य आरोपी डॉक्टरसह ८ जणांना अटक केली आहे. हे लोक सरोगसीच्या नावाखाली मुले होत नसणाऱ्या लोकांना मुले पुरवत असत. या लोकांकडून लाखो रुपये वसूल केल्यानंतर, ही टोळी एखाद्या गरीब व्यक्तीकडून मूल विकत घेऊन त्यांना देत असे. इतकंच नाही तर, ही टोळी शुक्राणू गोळा करण्याच्या बदल्यात भिकाऱ्यांना ४ हजार रुपये देत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
डॉक्टरांसह दलाल सामील
हैदराबादमधील सिकंदराबाद येथे असलेल्या 'सृष्टी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर'वर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या सेंटरच्या संचालक आणि मुख्य आरोपी डॉ. अथलुरी नम्रता, सरकारी डॉक्टर नारगुला सदानंदम आणि दलालांसह आठ जणांना अटक केली आहे. या सेंटरमध्ये बेकायदेशीर सरोगसी आणि मुलांची खरेदी-विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.
नेमकं काय सुरू होतं?
डॉक्टरांची ही टोळी अशा जोडप्यांना लक्ष्य करायची, ज्यांना काही कारणास्तव मूल होण्यास अडचण येत होती. अशा जोडप्यांना सांगितले जायचे की, ते आपले शुक्राणू आणि स्त्री बीज देऊन सरोगसीद्वारे मूल जन्माला घालू शकतात. त्या बदल्यात त्यांच्याकडून लाखो रुपये शुल्क आकारले जात असे. अशाच एका प्रकरणात, डॉ. अथलुरी नम्रता यांनी राजस्थानमधील एका जोडप्याकडून ३५ लाख रुपये घेऊन सरोगसीद्वारे मूल देण्याचे आश्वासन दिले होते. काही महिन्यांनंतर त्यांना नवजात बाळ देण्यातही आले.
कसा उघडकीस आला प्रकार?
आपले मूल जन्माला आल्याने हे जोडपे खूप आनंदी होते. पण, त्यांचे बाळ सतत आजारी पडत होते. यादरम्यान एका डॉक्टरने त्यांना बाळाची डीएनए चाचणी करण्याचा सल्ला दिला. बाळाचा डीएनए अहवाल समोर आला, तेव्हा त्यांना धक्का बसला. स्वतःचे शुक्राणू आणि स्त्री बीज दान करूनही ते मूल त्यांचे नव्हते. त्यांना देण्यात आलेले मूल हे एका मजूर जोडप्याचे होते, ज्यांनी त्यांचे मूल पैशासाठी विकले होते. आपली फसवणूक झाल्याचे कळताच जोडप्याने सिकंदराबादच्या गोपालपुरम पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर अथलुरी नम्रता आणि तिच्या केंद्राविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी केली कारवाई
या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी डॉ. अथलुरी नम्रता यांच्यासह ८ जणांना अटक केली आहे. तपासात असे दिसून आले की हे लोक बेकायदेशीरपणे ट्यूब बेबी सेंटर चालवत होते. २०२१ मध्ये या सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला होता. यापूर्वी डॉ. नम्रता यांच्याविरुद्ध १० गुन्हे दाखल झाले आहेत.