धक्कादायक...बलात्कारानंतर तरुणीची अॅसिड पाजून हत्या
By Admin | Updated: June 2, 2014 13:37 IST2014-06-02T13:36:26+5:302014-06-02T13:37:41+5:30
उत्तरप्रदेशमधील बरेली येथे नराधमांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यावर अॅसिड पाजून तिची हत्या केल्याची संतप्त घटना घडली आहे.

धक्कादायक...बलात्कारानंतर तरुणीची अॅसिड पाजून हत्या
ऑनलाइन टीम
बरेली, दि. २ - उत्तरप्रदेशमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच असून आता बरेली येथे नराधमांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यावर अॅसिड पाजून तिची हत्या केल्याची संतप्त घटना घडली आहे.
बरेलीतील ऐठपूरा या गावात शनिवारी रात्री एका २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदनात या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बलात्कारानंतर नराधमांनी तिला अॅसिड पाजले व त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी नराधमांनी तिच्या चेह-यावर अॅसिड ओतले व मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही केला होता असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांना घटनास्थळावर बियरची बॉटल व पेट्रोलचा एक रिकामा कॅनही आढळला आहे. त्यामुळे हत्येच्या उद्देशानेच तरुणीला घटनास्थळी आणले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.मृत तरुणी ही उत्तराखंडची असून पोलिसांचे एक पथक पुढील तपासासाठी उत्तराखंडला रवाना झाले आहे. पोलिस अधीक्षक जे.रविंद्र गोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये गेल्या आठवड्यात बदायू येथे दोघा बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांचे मृतदेह झाडावर लटकवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेवर देशभरात संतापाची भावना व्यक्त होत असतानाच आता बरेलीतील या अमानूष घटनेने उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडेच काढले आहे.