पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजिठा भागात विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या लोकांना अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मजिठातील भुल्लर, टांगरा, आणि सांधा या गावांमध्येही विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मृतांपैकी अनेकजण गावातील विटभट्टीवर काम करणारे कामगार आहेत. या घटनेनंतर कारवाई करत पंजाब पोलिसांनी बनावट दारू पुरवणाऱ्या मुख्य आरोपीसह पांच जणांना अटक केली आहे.
विषारी दारू प्यायल्याने या लोकांचे आरोग्य बिघडले आहे. सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मरारी कलान गावातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रभजीत सिंह हा बनावट दारू पुरवण्यामागील सूत्रधार आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय मुख्य आरोपीचा भाऊ कुलबीर सिंह उर्फ जग्गू, साहिब सिंह उर्फ सराई, गुरजंत सिंह आणि जीताची पत्नी निंदर कौर यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम १०५ बीएनएस आणि ६१अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केली कारवाई
विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमधील अनेक जण हे मरारी कलान गावचे रहिवाशी होते. यांपैकी अनेक लोक अजूनही जीवन आणि मृत्यूशी झुंजत आहेत. या घटनेनंतर पंजाब सरकारने कारवाई केली आहे. राज्य सरकारने राज्यभरात सुरू असलेल्या बनावट दारू व्यापाराची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत, तर मजिठा प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंजाबमध्ये विषारी दारू पिण्यामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही विषारी दारू पिण्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.